महाराष्ट्रातील सध्या सत्ता संघर्षाच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिक पिचल्या जात असल्याचा पुन्हा प्रत्यय आलेला आहे. महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. एका विवाहितेचा प्रचंड छळ करत सासरच्यांनी चक्क तिचे पाय बांधून तिच्या असह्य वेदनांना दुर्लक्ष करून तिच्याच मासिक पाळीचे रक्त एका बाटलीत घेऊन ते तिला वश करण्याच्या अनुषंगाने मांत्रिका जवळ दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या सर्व प्रकरणाने पुरोगामी महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असताना सुद्धा अपुरे मंत्रिमंडळ व राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमधल्या असमान वयाचा फटका आता सर्वसामान्यांना बसत असल्याचा पुन्हा जाहीर झाला आहे…
मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व रा. बीड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, शारिरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांनुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार २७ वर्षीय महिला विश्रांतवाडी भागात राहते. या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
विवाहानंतर ती बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करत आहेत.