वसई : औरंगाबाद शहरात एका रिक्षावाल्याने मुलीसोबत गैरवर्तणूक केली होती,त्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी होती. तशीच घटना मुंबई ते अहमदाबाद महामार्गावर समोर आली आहे. खासगी गाडीतील वाहनचालक आणि प्रवाशांनी विनयभंगाचा प्रयत्न केल्यामुळे एका वीस वर्षीय महिलेने आपल्या चिमुकल्या मुलीसह धावत्या गाडीतून उडी मारली. या घटनेत दहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर ही महिला जखमी झाली. या प्रकरणी विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात वाहनचालक आणि इतर तीन अनोळखी प्रवाशाविरोधात विनयभंग आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितनुसार, वाडा येथे राहणारी २० वर्षांची महिला दहा महिन्यांच्या मुलीसह नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार गावातील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. शनिवारी सकाळी ती वाडा येथे परत जाण्यासाठी निघाली होती. खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या इको वाहनात ती मुलीसह बसली या वेळी वाहनांमध्ये अन्य तीन प्रवासी होते. ते मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हारजवळील नोवेल्टी हॉटेलच्या समोरून जात असताना या महिलेने मुलीसह गाडीतून उडी मारली. या घटनेमध्ये मुलीचा मृत्यू झाला तर महिला जखमी झाली. वाहनचालक तसेच इतर प्रवाशांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी मुलीसह उडी मारल्याचे तिने पोलिसांना सांगितले
या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यामध्ये वाहनचालक तसेच इतर प्रवाशांविरोधात विनयभंगाचा तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे. ही महिला सुरुवातीला आपला जबाब बदलत होती. मात्र उशिरा आम्ही तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली. अन्य प्रवाशांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.