रामटेक – राजु कापसे
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या काचुरवाही ग्रामपंचायत हद्दीतील खोडगाव येथील एका पुजारी महाराजांच्या राहत्या झोपड्याला दि.21 जुलैला गुरु पौर्णिमेच्या दिवशी भीषणपणे आग लागून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, खोडगाव येथील सुशीला झिंगरू ठाकरे यांच्या घरी ईश्वर कोदबा नागोसे हे महाराज राहायचे.त्यांच्याकडे लहान-मोठ्या समस्या घेऊन भक्तगण यायचे.यातच भक्तांनी त्यांना दान दक्षिणा स्वरूपात दिलेले अंदाजीत २० हजार रुपये जळून राख झाले आहेत.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ईश्वर कोदबा नागोसे हे महाराज २५ वर्षापासून काचुरवाही येथील सुशीला झिंगरु ठाकरे यांच्या घरात राहतात. यापूर्वी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील चांदपूर मंदिरात १० ते १२ वर्षे वास्तव्यास राहून उपासना करीत सिद्धी प्राप्त केली. त्यानंतर ते काचुरवाही खोडगाव येथे येऊन पूजापाठ व आध्यात्मिक जीवन व्यथित करू लागलेत.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दि. २१ जुलै २०२४ ला दुपारी त्यांनी गुरुपौर्णिमेची पूजा पाठ केली.त्यानंतर रात्री ८:०० ते ८:३० वाजताच्या सुमारास ते एका खोलीत TV बघत असताना त्यांच्या राहत्या घरात अचानकपणे भीषण आग लागली.
घरातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
भीषण आगीत त्यांचे उपयोगी साहित्य व भक्तांद्वारे दान दिलेले २० हजार रुपये जळून राख होऊन गेले होते.
घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आली असून संबंधित पटवारी यांनी घटनास्थळी जाऊन सुशीला झिंगरू ठाकरे यांच्या नावाने पंचनामा केला आहे. प्रशासनाने पुजारी महाराज व घरमालक सुशीला झिंगरु ठाकरे यांना त्वरितपणे नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. महाराज राहत असलेल्या घरी आग कशी लागली हे गुढ मात्र अजूनपर्यंत कळले नाही.