न्यूज डेस्क : बांगलादेश विरुद्ध आशिया कप 2023 च्या शेवटच्या सुपर फोर सामन्यात भारतीय संघाला 6 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या पराभवामुळे टीम इंडियाचे कोणतेही नुकसान झाले नाही. भारत आधीच आशिया चषकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना ही भारतीय बेंच स्ट्रेंथ तपासण्याची संधी होती. यासाठी भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये पाच बदलही केले होते.
आता संघाला १७ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध विजेतेपदाचा सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षर पटेल दुखापतीमुळे फायनल खेळण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा स्टार अष्टपैलू खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता. कालच्या सामन्यादरम्यान तो खूप संघर्ष करताना दिसला. त्याच्या हाताशिवाय त्याच्या डाव्या मांडीतही समस्या होत्या. अक्षरने बांगलादेशविरुद्ध 34 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी केली होती. मात्र, तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षर पटेलसाठी 23 वर्षीय वॉशिंग्टन सुंदरला कव्हर म्हणून बोलावण्यात आले आहे. अक्षरच्या दुखापतीची तीव्रता सध्या कळू शकलेली नाही, मात्र शुक्रवारी रात्री प्रेमदासा स्टेडियमवर खेळताना त्याला खूप वेदना होत होता. अक्षरला याआधी सामन्यादरम्यान एका हाताला दुखापत झाली होती. यासाठी तो फिजिओला बोलावत असताना बांगलादेशी क्षेत्ररक्षकाचा थ्रो त्याच्या दुसऱ्या हाताला लागला. यानंतर फिजिओने त्याच्या डाव्या हाताला मनगटाजवळ पट्टी बांधली होती. त्याने पट्टीसह फलंदाजी सुरू ठेवली. शेवटच्या षटकाच्या आधी फिजिओ पुन्हा एकदा मैदानात आला आणि अक्षरच्या मांडीवर पट्टी बांधली. अशा स्थितीत तो फायनलसाठी अयोग्य दिसत होता. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.