मुंबई – गणेश तळेकर
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला ।। या दोन ओळींतच खर्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो. छत्रपती संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मृत्यूलाही ज्यांच्यासमोर ओशाळावं लागलं त्या हिमालयाएवढं कर्तुत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मनोमन नमन केलं जातं,
अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती अणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य रक्षणार्थ अनंत अत्याचार सोसत बलिदान देणाऱ्या या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आलेल्या संकटांवर पाय रोऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात घडणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे आदि कलाकारांच्या भूमिका ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात आहेत.
मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली असून कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.
चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कला-प्रतीक रेडीज, वेशभूषा-हितेंद्र कापोपारा, रंगभूषा-केशभूषा-शैलेश केसकर, साहसदृश्ये-बब्बू खन्ना, नृत्य दिग्दर्शक-विष्णु देवा, किरण बोरकर, ध्वनिमुद्रन/साउंड डिझाईन-निखिल लांजेकर अशी इतर श्रेयनामावली आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए.फिल्म्स सांभाळत आहे