सा. बा. विभागाचे अवर सचिव लहाने यांनी दिले कारवाईचे अहवाल सादर करण्याचे आदेश…
नांदेड – महेंद्र गायकवाड
सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत इस. सन 2020, 21, 22 आणि 23 या वर्षांमध्ये करण्यात आलेल्या अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार भोकर येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल पवार यांनी अनेक पुराव्यासह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
त्यांच्या तक्रारीची दखल घेत नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वरील इस सणांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येऊन मंत्रालयामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे भोकर तालुका प्रमुख अमोल पवार यांनी दिलेल्या तक्रारिरीत म्हण्टले आहे कि,भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत भोकर तालुक्यात सन 2020- 21,2021-22 व 2022-23 या कार्यकाळात करण्यात आलेली सर्व कामे विशिष्ट गुत्तेदारांना हाताशी धरुन व इंटरनल टेंडर प्रक्रिया मॅनेज करुन मर्जीतील गुत्तेदारांना कामे देवुन बोगस प्रकारची कामे करण्यात आलेली आहे.
या कार्यकाळात करण्यात आलेल्या सर्व कामात कुठल्याही शासकीय नियमांचे पालन करण्यात आले नाही. सदरच्या ब्रिज बांधकाम, सि.सि.रोड बांधकाम, ड्रेनेज बांधकाम व इतर सर्व कामामध्ये इंटरनॅशनल बिल्डींग कोडचा उपयोग करण्यात आला नाही. अनेक जागेवर अंदाजपत्रकानुसार कामे न करता थातुर मातुर कामे करण्यात आली आहेत.
दहा लाख रुपयाच्या आतील अनेक कामे फक्त कागदोपत्री दाखवुन प्रत्यक्ष जागेवर कोणत्याही प्रकारचे काम न करता बिल मंजुर करुन रक्कम उचलण्यात आलेली आहे. सर्व कामात फार मोठा भ्रष्टाचार अधिकारी, कर्मचारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने करण्यात आला आहे. सदर अधिकाऱ्यांचे गुत्तेदारांसोबत लागेबांधे असल्यामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस कामे करुन सदर कार्यकाळात बिल उचलण्यात आलेले आहेत. सदरील कार्यालयातील अनेक अधिकारी
कर्मचाऱ्यांचे बदली कार्यकाळ संपुन देखील अद्याप पर्यंत जिल्हा अंतर्गत बदली किंवा जिल्हा बाहय बदली करण्यात आलेली नाही. सदरील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन Scrap विक्रीमध्येही फार मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
त्यामुळे या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभाग, भोकर अंतर्गत उपविभाग, भोकर मार्फत करण्यात आलेल्या सर्व कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची रक्कम वसुल करण्यासह त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी या आशयाचे निवेदन पाठविण्यात आले होते.
त्यावर महाराष्ट्राचे आवर सचिव श्री लहाने यांनी एक पत्र काढले असून या चौकशीसाठी नांदेड येथील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून चौकशी पूर्ण करून मंत्रालयात तात्काळ अहवाल देण्यासंदर्भात सुचित केले आहे. संबधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर राजकीय वरदहस्त असल्याने या प्रकरणाची काय चौकशी होईल याकडे लक्ष लागले आहे.