शिवसेना पक्षाच्या नावाच्या पॅनकार्ड व टॅन कार्डचा तसेच आयकर विभाग संबंधित लॉग-इन व पासवर्ड चा गैरवापर होत असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा – किरण पावसकरांची मागणी…
किरण पावसकरांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार नोंदवली…
मुंबई – धीरज घोलप
शिवसेना पक्ष व पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार आमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. पण असे असूनसुद्धा पक्षाच्या अकाउंट संबंधीत काम करताना तसेच आयकर खात्याच्या निर्देशानुसार जो लॉग-इन करावे लागते, त्याचा पासवर्ड लागतो. त्याबाबत गोंधळ सुरु आहे.
शिवसेना पक्षाच्या नावाचा, पक्षाच्या मूळ पॅनकार्ड, टॅन कार्ड (TAN कार्ड), तसेच आयकर संबंधित गोष्टींचा उबाठा पक्षाकडून गैरवापर सुरु आहे असा आमचा आरोप आहे आणि यासंदर्भात सखोल चौकशी व्हायला हवी, आणि संबंधितांवर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे, तसेच याआधी सुद्धा कुणी याचा गैरवापर करून व्यवहार केला असेल, पैसे काढले असतील तर त्याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज शिवसेनेचे मा. आमदार किरण पावसकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी शिवसेना पक्षाच्या आयकर विभाग संबंधित लॉग-इन, पासवर्डसचा गैरवापर (misuse of login & passwords ) केल्याबद्दल तसेच इतर गंभीर बेकायदेशीर कृत्यांच्या विरोधात लेखी तक्रार शिवसेना पक्षाचे मा. आमदार व शिवसेना सचिव किरण पावसकर, संजय मोरे, सिद्धेश कदम, भाऊ चौधरी तसेच शिवसेना पक्षाचे खजिनदार आमदार डॉ. बालाजी किणीकर या शिष्टमंडळाने जाऊन मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज ३० जानेवारी २०२४ रोज़ी नोंदवून कायदेशीर कारवाई ची मागणी केली, त्यावेळेस ते बोलत होते.
किरण पावसकर पुढे म्हणाले की, आम्ही आमच्यासाठी पैसे घेतले नाहीत. आमचे नेते आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्वीपासूनचे वाक्य होते, आम्हाला त्यांची प्रॉपर्टी व पैसे नकोत. आम्हाला फक्त बाळासाहेबांचे नाव व शिवसेनेचे आमदार-खासदार जे आमच्याकडे आलेले आहेत. त्यांची फक्त काळजी घायची आहे.
पण आता नियमानुसार आयकर व टीडीएस भरण्यासाठी आम्हाला तांत्रिक गोष्टी हव्यात. पण त्यातच जर घोटाळा होत असेल, तर त्याची चौकशी व्हायलाच हवी आणि यासाठीच आम्ही आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्याजवळ यांसंबंधी लेखी तक्रार केले. मुंबई पोलीस आयुक्तांनी सुद्धा आम्हाला या संदर्भात सर्व स्तरावर सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच सत्य समोर येईल, असा आम्हाला विश्वास आहे.