धीरज घोलप
शिवसेना संसदीय पक्षाने उद्या लोकसभेत येणाऱ्या अविश्वास प्रस्तावाविरोधात बोलण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नेमणूक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास ठरावाविरोधात डॉ. शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडतील.
विरोधकांच्या अविश्वास ठरावाविरोधात शिवसेनेतर्फे पक्षाची बाजू मांडण्याची संधी शिवसेना संसदीय पक्षाने डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिली आहे.
युपीए सरकारच्या कालावधीत देशाची सर्व पातळ्यांवर झालेली अधोगती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या 9 वर्षांच्या दैदीप्यमान काळात देशाची झालेली सर्वांगीण प्रगती व विकासकामे याबाबत संसदेत माहिती देऊन खा. शिंदे विरोधकांच्या आरोपातील फोलपणा देशाला दाखवून देतील.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याला अनेक आघाड्यांवर अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्राची विकासाची घोडदौड सुरु झाली असल्याकडे देखील खा. शिंदे सभागृहाचे लक्ष वेधतील.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच आठवड्यात विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा ठराव स्वीकारला आहे. त्यावर उद्या होणाऱ्या चर्चेत खा. डॉ. शिंदे शिवसेनेची भूमिका मांडतील. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देत डॉ. श्रीकांत शिंदे मोदी सरकारच्या बाजूने मत मांडतील.