नांदेड
शिवसेनेचे नेते माजी खासदार हेमंत भाऊ पाटील हे देगलूर दौऱ्यावर आले असता त्यांनी देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असल्याचे वक्तव्य केल्यानंतर नुकतेच काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले माजी आमदार जितेश अंतापूरकर यांची चिंता वाढली असून या मतदारसंघावर पूर्वीपासूनच शिवसेना शिंदे गटाने
आपला दावा व्यक्त केला आहे. त्यामुळे महायुतीत हि जागा शिवसेना की भाजप कुणाला सुटेल हे अद्याप तरी सांगता येणार नाही.
काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी आमदार पदाचा राजीनामा देऊन नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला त्यामुळे भाजपमध्ये असलेले माजी आमदार सुभाष साबणे यांची गोची झाली. देगलूर -बिलोली विधानसभा निवडणुकीसाठी साबणे हे इच्छुक असतानाच विद्यमान आमदार अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साबणे बॅकफूटवर गेले आहेत. साबणे यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येत आहे.
क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने अंतापूरकर यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर अंतापूरकर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्षप्रवेश केला व देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आपण निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले परंतु या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने पूर्वीपासूनच आपला दावा व्यक्त करीत मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी, विविध कार्यक्रम, मेळावे यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गट देगलूर बिलोली मतदारसंघात घराघरात पोहोचला. त्यामुळे शिवसेनेचे या मतदारसंघात राजकीय वजन वाढल्यानंतर आमदार अंतापुरकर हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेले होते. तेव्हाच ते शिंदे गटात प्रवेश करतील असे वाटले परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी अंतापूरकरांना ग्रीन सिग्नल दिल्या नसल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केले.
एकीकडे दोन वेळेस काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून क्रॉस वोटिंग केली व विरोधकांच्या सोबत छुप्पी हात मिळवणी केली असल्याची चर्चा आजही मोठया प्रमाणात ऐकावंयास मिळते. ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्यांच्याशी चर्चा न करता अचानक काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडून दिलेल्या जनतेची गद्दारी केली. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला आहे. भाजपकडून आपणच उमेदवार असल्याचे ते सांगत आहेत.शिवसेना नेते हेमंत पाटलांचा देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघात शिवसेने कडून दावा करण्यात आला असल्याने माजी आमदार अंतापूरकर यांची डोकेदुखी वाढली आहे. एक वर्षापासून शिंदे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी तळागळातील कार्यकर्त्यांना घेऊन हा मतदारसंघ पिंजून काढत असुन या मतदारसंघावर शिवसेना विधानसभा प्रभारी,जिल्हाप्रमुख यांनी यापूर्वीच दावा केला होता. त्यानंतर दोन दिवसाखाली शिवसेना नेते हेमंत पाटील हे देगलूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी सुद्धा या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे अंतापुरकर यांची चिंता वाढली आहे. भविष्यात महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे की भाजपाला हे येणारा काळच ठरवेल परंतु सध्या स्थितीत शिवसेना हा मतदारसंघ पिंजून काढत आपला दावा व्यक्त करीत ही निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.यापूर्वी शिवसेनेकडून निवडून आलेल्या साबणे यांनी ऐन पोटनिवडणूकीत भाजपमध्ये प्रवेश केला. व भाजपकडून निवडणूक लढविली.भाजपच्या सुभाष साबणे यांचा पोटनिवडणूकीत दारुण पराभव झाला होता. पूर्वीपासूनच ही जागा शिवसेनेने लढवली असल्याने आताही शिवसेना शिंदे गटाने या जागेवर आपला दावा केला आहे.