राज्यातील राजकीय नेत्यांची पातळी आता कोणत्या स्थराला जात आहे ही जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे, तीन महिन्यांपूर्वी गुवाहाटी गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याची चर्चा सुरू होती, मात्र आता खुद्द सत्ताधारी गटाचे फडणवीस यांचे निकटर्तीय आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपाने तर जनतेला पुरावाच मिळाला?…यावर संतापलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत थेट शिंदे-भाजप सरकारलाच आव्हान देत राणांच्या आरोपाबाबत भूमिका स्पष्ट करावी,अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल,असा इशारा दिला. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या काही आमदार माझ्या संपर्कात असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले, राणांनी केलेल्या वक्तव्याने अनेक आमदार दुखावले गेले आहेत. यातील १२ आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यावर आता दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे.
“बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून, त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोड संयम ठेवायला हवा,” असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रवी राणांच्या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. रवी राणांनी माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावा. तसेच, रवी राणांनी माझ्यावरील भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपाचे पुरावे सादर केले नाहीतर, न्यायालयात जावू, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील अपक्ष आमदार व माजी मंत्री बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात खोके व मोफत किराणा वाटपावरून वाद सुरू आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांचा शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा आहे. मात्र तरीही दोघांकडूनही परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत असून त्याची पातळीही खालावली आहे.