Saturday, November 23, 2024
Homeराजकीयशिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे एजंट!...नाना पटोले

शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे एजंट!…नाना पटोले

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर २०२२

महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे. दुर्देवाने यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्वातील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स अशा अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी शाह यांनी ED चा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणा-या कळसुत्री बाहुल्यांचे सरकार आणले आहे. या सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉनचा २ लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. बल्क ड्रग पार्क प्रकल्पही राज्याबाहेर गेला. त्यानंतर आता टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रूपयांचा प्रकल्पही गुजरातला गेला. राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता निर्लज्जपणे हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला असे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे ? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: