शेगाव/मूर्तिजापूर : मूर्तिजापूर ते शेगाव दरम्यान एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या गुजराथेतील कुटुंबीयांची सुमारे पाच लाखाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार शेगाव पोलीसांनी आज नोंदवून न घेतल्यामुळे जिल्हा पोलीसांकडे इ मेल द्वारे तक्रार पाठविली असून आता तरी त्यांना न्याय मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावलचे रहिवासी अशोक दौलतराव अंबुसकर यांनी पोलीस अधिक्षकांना मेल द्वारे दिलेल्या तक्रारीनुसार ते मूर्तिजापूर येथील त्यांच्या नातेवाईकांकडील कार्यक्रमाला उपस्थिती देऊन मंगळवारी (ता.१३) सकाळी पावणे दहाच्या दरम्यान नागपूर-शेगाव बसने शेगाव ला निघाले. दोन दिवस शेगाव मधील कामे आटोपल्यानंतर शनिवार (ता.१७) सकाळी ६ च्या नवजीवन एक्स्प्रेस ने वेरावल ला जाण्याच्या दृष्टीने सामान आवरत असतांना त्यांना त्यांची बॅग फाटलेली व त्यातून सुमारे ५ लाखाचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले.
लगेच त्यांनी शेगाव शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांची तक्रार दाखल करवून घेण्यास नकारदेत ती मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्याबाबत त्यांना बजावण्यात आले. आमचे दागिने चोरी झाल्याचे आमच्या निदर्शनास शेगावला आल्याचे सांगूनही अंबुसकर यांचे म्हणने ऐकून घेण्यात आले नाही. दुपार पर्यंत त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याच्या शेगाव पोलीसांच्या प्रतापामुळे व दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.१७) त्यांचे नवजीवन एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन असल्यामुळे त्यांनी थेट बुलडाणा व अकोला जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे इ मेल करून आप बिती कळविली. आता तरी त्यांना न्याय मिळून त्यांची तक्रार दाखल करवून घेतल्या जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.