आकोट- संजय आठवले
दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ हा दिवस अकोलेकरांकरिता खास दिवस ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर या दिवशी प्रथमच शरद पवार या ८३ वर्षीय महायोद्ध्याचे अकोला शहरात प्रथम आगमन झाले. त्यानिमित्याने त्यांच्या उपस्थितीत अनेक लहान-मोठे सोहळे शहरात संपन्न झाले. हजारो लोकांना त्यांच्या सानिध्याचा तथा त्यांचे विचार ऐकण्याचा सुवर्णयोग आला. त्यातच एक अविस्मरणीय योग आला जे.आर.डी. टाटा स्कूल अँड एड्युलॅब या शिक्षण संस्थेच्या भव्य प्रांगणात.
भारत जोडो या अभियानाचे मुख्य प्रवर्तक प्रशांत गावंडे यांनी या ठिकाणी एक अभिनव सोहळा आयोजित केला. समाजातील विविध स्तरात मोठे योगदान देणारे परंतु उपेक्षित घटक आहेत. त्यांचा आवाज थेट शरद पवार यांचे कानी पडावा, म्हणून या ठिकाणी हे उपेक्षित घटक आणि शरद पवार यांचे दरम्यान संवाद साधणारा सोहळा असे या सोहळ्याचे स्वरूप होते. सहसा दिग्गज नेते भव्य, आलिशान व उंच मंचावर तर सामान्य लोक लांबवर अशी प्रत्येक कार्यक्रमात बसण्याची वहिवाट असते. मात्र या ठिकाणी ती परंपरा मोडीत काढून हे अंतर मिटविण्यात आले. आणि शरद पवार हे सर्व उपस्थितांच्या बरोबरीने स्थानापन्न झाले.
वास्तविक या ठिकाणी होतकरू आणि उपेक्षितांशी पवारांचा संवाद होणार होता. मात्र शहरातील अनेक प्रस्थापितांना पवारांचे लोकांमध्ये मिसळणे नको होते. त्यामुळे प्रत्येक बाबीत राजकीय हित शोधणारांनी आपल्या संस्कारानुसार या संवादाला खोडा घालण्याचा प्रयास केला. परंतु वास्तव जाणल्यावर शरद पवारांनी या ठिकाणी घालविण्याची वेळ आणखी वाढवून दिली. आणि सोहोळ्याचे स्वरूप पाहून पुढील दौऱ्यात या ठिकाणी अधिक वेळ देण्याची ग्वाही सुद्धा दिली. हे सारे घडत असताना संवादाचे ठिकाणी एका अविस्मरणीय योगाचे सारे उपस्थित साक्षीदार ठरले.
ते असे कि, संवाद कार्यक्रमस्थळी शरद पवारांना विराजमान होणेकरिता एक खास खुर्ची ठेवण्यात आली होती. दिसायला साधी असली तरी सामान्यापेक्षा ती बरीच मोठी आणि आरामदायक बनविण्यात आली होती. ही खुर्ची आकोटच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सचिन आणि गोपाल बिहाडे या दोन बंधूंनी बनविली आहे. विशेष बाब म्हणजे ही खुर्ची बनविताना रवि पाटील अरबट हे या दोन बंधूंना विविध सूचना देत होते. त्यावेळी त्या दोघातील एकाने सहजच म्हटले कि, “भाऊ तुम्ही अशी खुर्ची बनवित आहात की जणू शरद पवारच तिचेवर बसणार आहेत.” असे बोलतांना त्याला जराही कल्पना नव्हती की, पुढील ४/६ महिन्यातच त्याचे बोल वास्तव बनणार आहेत.
ही खुर्ची बनविल्यानंतर जवळपास चार सहा महिने ती रवि अरबट यांनी सांभाळून ठेवली. तीवर कुणीही बसले नाही. आणि १२ ऑक्टोबर रोजी त्या काष्ठ शिल्पकाराचे बोल खरे ठरले. प्रशांत गावंडे यांचे शिक्षण संस्थेतील संवाद सोहळ्यात खुद्द शरद पवार पहिल्यांदा त्या खुर्चीवर विराजमान झाले. आणि आकोट शहरातील दोन बंधूंनी बनविलेल्या त्या खुर्चीचे सोने झाले. या प्रकाराने आता त्या खुर्चीभोवती आपोआपच एक अविस्मरणीय ऐतिहासिक आठवण कायमची गुंफल्या गेली आहे.