मिलिंद खोंड
गडचिरोली, ता. २७: महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर सिरोंचा तालुक्याला लागून तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडीगड्डा धरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.
मागील महिनाभरापासून सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्ढा धरणग्रस्त शेतकरी अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्यात यावा, नव्याने सर्वेक्षण करून बाधित क्षेत्राचेदेखील अधिग्रहण करून त्याचाही मोबदला देण्यात यावा आदी मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. हिवाळी अधिवेशनातदेखील त्यांनी साखळी उपोषण केले. मात्र, प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांनी हा मुद्दा आज विधान परिषदेत लावून धरला.