अमरावती – दुर्वास रोकडे
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे 30 प्रशिक्षण पदांसाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्रताधारक युवक-युवतीनी दि. 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अहर्ताप्रमाणे बारावी पासकरिता 6 हजार रुपये, आयटीआय किंवा पदवीकाधारकासाठी 8 हजार व पदवीधर किंवा पदव्यूत्तर करिता 10 हजार रुपये शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे.
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवारांचे किमान वय १८ ते ३५ वर्ष असावे, शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाही, उमेदवारांची आधार नोंदणी असावी. उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवारांने विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
अधिक माहीतीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, शासकिय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टँण्ड रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधवा किंवा मो. क्र. ८६०५६५४०२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशिक्षण उमेदवारांची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी नि:शुल्क व्यवस्था मुलाखतीच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.