नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर नांदेड येथे सकाळपासून होणार आहे. या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.
माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड या मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे (संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे अधिकृत रेकॉर्डिगसाठी वापरले जाणारे कॅमेरे वगळता) यांच्या वापरासाठी, तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन व मतमोजणीच्या कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी तसेच, मतमोजणी केंद्रापासून 100 मीटरच्या आतमधील क्षेत्र हे पादचारी क्षेत्र राहील ज्यामध्ये वाहनांच्या हालचालीसाठी सुध्दा या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश मंगळवार 4 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून 16-नांदेड लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.