अकोला – संजय आठवले
मुर्तीजापुर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे प्रशासनाच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा बुरखा फाडला असून मुर्तीजापुर निकट रेल्वे रुळाखालील गौण खनिज वाहून गेल्याने त्या ठिकाणी पाण्याचा मोठा लोंढा वाहणे सुरू झाले आहे. या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांच्या सतर्कतेने येथे रेल्वे गाडीचा अपघात टळला आहे. या मार्गावरील रेल्वे सेवा ताबडतोब बंद करण्यात आली होती. मात्र आता ती पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
मुर्तीजापुर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतांमध्ये पाणी तुंबले आहे. अशा स्थितीने मुर्तीजापुर तालुक्यातील माना रेल्वे स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळाबाबत धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी तुंबलेल्या पावसाच्या जोराने रेल्वे रुळाखालील गौण खनिज चक्क वाहून गेले आहे.
त्यामुळे रुळाखालून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाला आहे. याची कोणतीच कल्पना नसल्याने या मार्गावरून येजा करणाऱ्या गाड्या नियमितपणे सुरू होत्या. मात्र या ठिकाणी असलेल्या शेतातील शेतकऱ्यांचे ध्यानात ही बाब आली. तितक्यात त्या लोकांना समोरुन प्रवासी रेल्वे येत असल्याचे दिसले.
लगेच या लोकांनी आरडाओरडा करून रेल्वे चालकाचे लक्ष वेधून घेतले. आणि त्याला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यामुळे या ठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना ध्यानात येतात संबंधितांनी ताबडतोब रेल्वे प्रशासनाला ही खबर दिली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने ही खबरदारी घेतली असली तरी, यानिमित्ताने रेल्वे प्रशासनाचा भ्रष्टाचारी कारभार उघड झाला आहे. त्यामुळे कंत्राटदाराने केलेले निकृष्ट काम आणि त्याला रेल्वे प्रशासनाने दिलेली मंजुरी या साऱ्या बाबी प्रश्नांच्या घेऱ्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाद्वारे रेल्वे रुळाची देखभाल करण्याचे दृष्टीने नियमितपणे तपासणी केली जाते.
त्यावर रेल्वे प्रशासन दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. तरीही अशा घटना घडतच आहेत. त्यामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाद्वारे देखभाल दुरुस्तीचे काम चौकसपणे व गंभीरतेने होत नसल्याचे दिसून येते.
प्राप्त माहितीनुसार नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या भुसावळ मधील सर्व रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या होत्या. वर्धेकडे जाणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवास सडक मार्गे करावा लागला होता.
अन्य गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या. पाण्याचा प्रवाह थांबल्यानंतरच हा मार्ग काम रेल्वेकडून सुरु केले आणि आता पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.