पेंच प्रशासनाच्या कामगिरीत मानाचा तुरा
राजु कापसे
रामटेक
पेंच येथे एन.ए.एफ.सी.सी. अंतर्गत तोतलाडोह वसाहत क्षेत्रातील इको रेस्टॉरेशन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यात अनेक यंत्रणा सहभागी करून एक नाविन्यपूर्ण प्रकल्प मार्गक्रमण करत आहे. या प्रकल्पाच्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेली असुन नुकताच या प्रकल्पाला स्कोच पुरस्कार घोषीत करण्यात आलेला आहे. परीणामस्वरूप यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनअधिकारी – कर्मचार्यांमध्ये आणखी उत्साहाने कार्य करण्याची कल्पना साकारली आहे.
माहितीनुसार, स्कोच समूह हा १९९७ पासून सर्वसमावेशक वाढीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक-आर्थिक समस्या हाताळणारा भारतातील अग्रगण्य थिंक टँक आहे. स्कोच समूह धोरणात्मक निर्णयांमध्ये भारतीय समाज व्यवस्थेची गरज व त्यातील संदर्भ आणण्यासाठी सहकार्याची भूमिका बजावत असतो. त्यासोबतच फॉर्च्यून- ५०० कंपन्या, सरकारी मालकीचे उद्योग, शासनाशी विविध प्रकारे संलग्न आहे. यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये क्षेत्रीय हस्तक्षेप, सल्लागार, संशोधन अहवाल, प्रभाव मूल्यांकन, धोरण संक्षिप्त, पुस्तके, जर्नल्स, कार्यशाळा आणि परिषदांचा समावेश आहे. स्कोच समूहाकडून शासन, वित्त, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च स्वतंत्र प्रशासन सन्मान प्रदान करण्यात येतात.
दरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात आलेले ” कुरण शेती ” , “अटल घन वन वृक्ष लागवड ” यासह विविध उपक्रमाने भल्याभल्यांचे लक्ष केंद्रीत केले होते हे तेवढेच खरे आहे. यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशाषणाने घेतलेल्या परीश्रमाचे आज फलित झाले असल्याचे बोलल्या जात आहे.
अशी झाली निवड प्रक्रिया
या पुरस्कारासाठीची पहिल्या टप्प्यावरील कार्यवाही साधारणत: मार्च २०२२ पासून सुरु झाली. दुसऱ्या टप्प्यात सादरीकरणासाठी निवड, तिसऱ्या टप्प्यात राबविलेल्या उपक्रमाच्या पडताळणीसाठी निवड, चौथ्या टप्प्यात तज्ञांचे मत, उपक्रमाची लोकप्रियता याचे गुणांकन, पाचव्या टप्प्यात समस्या, त्या सोडविण्याकरिता करण्यात आलेले उपाय, त्याचे परिणाम तसेच अंमलबजावणी करताना येणारी आव्हाने, नवकल्पना व प्रतिकृती आदींचे सादरीकरण आणि शेवटच्या टप्प्यात हे सादरीकरण केल्यानंतर हा “सुवर्ण” पुरस्कार देण्यात येत असल्याची माहीती पुर्व पेंच चे वनपरीक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांनी दिली.