अकोला – (सैयद असरार हुसैन) स्थानिक रतनलाल प्लॉट येथील उस्मान आझाद उर्दू हायस्कूल व के.एम.असगर हुसेन कनिष्ठ महाविद्यालय येथे उर्दू एज्युकेशन सोसायटी अकोला व बेरार तालीमी कारवाँ यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्हा शिक्षण अधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांच्या हस्ते दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
खान मोहम्मद अजहर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सय्यद इशाक राही सीईओ शाह बाबू एज्युकेशन सोसायटी पातूर, मुफ्ती मोहम्मद अशफाक कासमी अध्यक्ष अली पब्लिक स्कूल, मोहम्मद फारुख सचिव फ्रेंड्स सोशल वेलफेअर सोसायटी, मोहम्मद झाकीर अध्यक्ष इक्रा स्कूल, मोहम्मद फाजील अध्यक्ष सुफ्फाह स्कूल, मोहम्मद फाजिल, प्राचार्य इम्तियाज अहमद खान, मुख्याध्यापक तस्किन खान, मजहर खान, अकबर अली खान, आरिफ सर, लुबना मॅडम, अर्शद इकबाल खान, फिरोज खान, मोबीन खान, शाकीर अली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्रा मोहम्मद रफिक यांनी प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली. आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान हे खूप महत्वाचे असून विद्यार्थिनींनीही त्यात पुढे आले पाहिजे.असे प्रतिपादन डॉ.सुचिता पाटेकर यांनी केले व आपल्या भाषणात विद्यार्थिनींमध्ये जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतो याची विविध उदाहरणे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तसेच मुफ्ती अशफाक कासमी साहिब म्हणाले की, कुराणमध्ये अल्लाहने लक्ष देण्याचे आणि काळजी करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळते. सय्यद इशाक राही यांनी विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक करून उपस्थितांना मार्गदर्शन करून संशोधनासाठी प्रेरित केले. सर्फराज नवाज खान यांनी बेरार तालीम कारवाँचे उद्दिष्ट आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करावयाच्या कार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात श्री खान मोहम्मद अजहर हुसेन म्हणाले की, आजही भारतात आणि संपूर्ण जगात मुस्लीम लोक विज्ञान आणि संशोधनात आपले नाव गाजवत आहेत, मात्र ही संख्या खूपच कमी आहे.आपल्या मुलांनी यात मोठ्या उत्साहाने पुढे आले पाहिजे. आणि त्यांच्यात दडलेल्या कलागुणांना समोर आणले पाहिजे. भविष्यातही आम्ही असेच कार्यक्रम आयोजित करत राहू.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. मिर्झा खालिद रझा यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.परवेझ अख्तर यांनी केले. यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी सहभागी विद्यार्थ्यांव्यतिरिक्त मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उस्मान आझाद उर्दू हायस्कूल, रूह अफजा खानम हायस्कूल व के.एम.असगर हुसेन कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.