लाखनी – सुरेश शेंडे
लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता २रीच्या ९ ते १० विद्यार्थ्यांनी जांभूळ समजून शालेय परिसरातील वेलीवरील विषारी फळ खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना बुधवार (ता.४) ला दुपारचे सुमारास उघडकीस आली. या विषबाधित सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
युग नंदेश्वर, शिवम उके, मंथन शेंदरे,तन्मय कुथे,स्नेहल राउत,नेत्रा राउत,देवांगी नान्हे, प्राप्ती बावणे अशी विषबाधित विद्यार्थ्यांची नावे आहेत.या घटनेबाबद माहिती होताच मुख्याध्यापक शरद भाजीपाले,सरपंच वर्षा रेहपाडे, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्यांनी बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेले.
घटनेची माहिती केंद्रप्रमुख गडेगाव तथा लाखनी पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांना देण्यात आली. बाधित विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले.सर्व विद्यार्थी वार्ड क्रमांक १२ मध्ये भरती असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.या घटनेने पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शालेय प्रशासन घटना कशी घडली?याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भाजपा जिल्हा सचिव डॉ.विजया ठाकरे नंदुरकर यांनी सामान्य रुग्णालय भंडारा येथे जाऊन सर्व विद्यार्थ्यांची भेट घेतली व मुलांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. विद्यार्थ्यांच्या प्रकृतिविषयी कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचेशी चर्चा केली. यावेळी संजय सावरकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन कुथे, उके,मुख्याध्यापक शरद भाजीपाले उपस्थित होते.