आकोट – संजय आठवले
अवघ्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांच्या दयनीय अवस्थेबाबत दाखल जनहित याचिकेवर राज्यातील सर्व शाळांची तपासणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून आकोट उपविभागातील शाळांच्या तपासणी करता आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी यांची चमू कार्य प्रवण झाली आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगर पालीका, नगर पालिका यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळा अतिशय हलाखीच्या अवस्थेत असल्याची याचिका पालकांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर या शाळांची वर्तमान स्थिती जाणून घेणेकरिता मुंबई उच्च न्यायालयाने सर्व जिल्हा व सत्र न्यायाधीशांना आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांच्या तपासणीचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी शाळा तपासणीचे वेळापत्रक तयार केले आहे. या तपासणी करिता त्यांचे सोबत आकोट उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, गटविकास अधिकारी गजानन सावरकर यांचे चमुने उपविभागातील प्रत्येक शाळांना प्रत्यक्ष भेट देणे सुरू केले आहे.
या मोहिमेची सुरुवात नगरपरिषद आकोटच्या शाळांपासून करण्यात आली. त्यानंतर दिनांक १० ऑक्टोबर पासून १३ ऑक्टोबर पर्यंत आकोट तालुक्यातील १३६ शाळांपैकी किनखेड, करोडी, बळेगाव व वरूर या केंद्रातील २६ शाळांची तपासणी पूर्ण झाली आहे.
सुट्टीचे दिवस वगळता उर्वरित ११० शाळांना भेटी देण्यात येणार असून दिनांक २७ ऑक्टोबर रोजी ही मोहीम पूर्ण होणार आहे. या मोहिमेत शाळेची इमारत, तेथील सुविधा जसे शौचालय, मुत्रीघर, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शालेय पोषण आहार, शैक्षणिक प्रगती, शिक्षक संख्या, शाळा इमारत सुरक्षा, विद्यार्थी उपस्थिती याची तपासणी केली जात आहे.
दि.१६ ऑक्टोबर पासून खालील शाळांना भेटी देण्यात येणार आहेत—-
ऑक़्टो.१६- मंचनपूर, सावरा, देऊळगाव, रंभापुर, वडाळी देशमुख, पणज, धामणगाव, बोचरा, चंडिकापूर, दिवठाणा.
ऑक्टो.१७- वाई, वडगाव मेंढे, ताजनापुर, कालवाडी, करतवाडी, तांदुळवाडी.
ऑक्टो. १८- शहापूर, कासोद, राहणापूर, शहानुर, मलकापूर, पोपटखेड, मोहाळा, सुकळी रामापुर, बोर्डी, धारूर, दहिखेल, सोमठाणा, केलपाणी.
ऑक्टो.१९- अकोली जहांगीर, अंबाडी, राजुरा, अकोलखेड, आंबोडा.
ऑक्टो.२०- देवरी, पिंप्री, आलेवाडी, पाटसुल, रौंदळा, पारळा, पळसोद, पनोरी, दनोरी, देवर्डा, तरोडा.
ऑक्टो. २३- एदलापूर, पिंपरी खुर्द, जितापूर, मक्रमपूर, बेलुरा, उमरा, लाडेगाव.
ऑक्टो. २५- वडाळी सटवाई, पिंपळखुटा, नेव्होरी, जळगाव नहाटे, अडगाव, पिंपरी, चोरवड, खैरखेड.
ऑक्टो.२६- बांबर्डा, सावरगाव, कवठा, पुंडा.
ऑक्टो.२७- महागाव, रुईखेड, मार्डी, खिरकुंड, डांगरखेड, चीचपाणी, वस्तापूर, महागाव, मानकरी, जनूना, राजुरा, गिरजापूर, कुंड, कोहा, रुधाडी.
राज्य शासनाने शाळा दत्तक देण्याचे धोरण नूकतेच घोषित केले आहे. त्याकरिता या मोहिमेद्वारे संकलित माहितीचा उपयोग केला जाणार असल्याची अटकळ माहितगार लावीत आहेत.