बुलढाणा: चिखली तालुक्यातील सौरभ दत्तात्रय जपे यांना नुकतीच मुंबई येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात शरद पवार (कृषी) इंस्पायर फेलोशिप २०२३-२४ प्रदान करण्यात आली. या फेलोशिपचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री मा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया ताई सुळे, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सौरभ हे सी.एस.एम.एस कृषी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि वेलींगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई मधून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात काहीतरी नवे करू इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांना कृषीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती अवगत करणे आणि तरुणांमधील उद्योजकीय मानसिकता आणि नेतृत्व गुण वाढविणे हा उद्देश लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण सेन्टर कडून शरद पवार इंस्पायर फेलोशिप राबवण्यात येते.
या फेलोशिप साठी सौरभ यांनी अर्ज केला होता. अर्ज चाचणी आणि मुलाखत या अतिशय कठीण प्रक्रियेनंतर सुमारे २००० विद्यार्थ्यांमधून ७० विद्यार्थी निवडले गेले. यात बुलढाणा जिल्ह्यातून सौरभ यांची निवड झाली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (A.I) प्रणालीचा उपयोग करून शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे हा सौरभ यांचा संशोधन विषय आहे. त्यांच्या या संशोधनामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. A.I. च्या मदतीने योग्य बियाणे, खत आणि सिंचनाचा वापर केल्यास उत्पादन वाढू शकते आणि बाजारपेठेतही चांगला भाव मिळू शकतो. सौरभ यांच्या या संशोधनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होऊ शकते.
सौरभ यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कृषी क्षेत्रातील मान्यवर, कव्हळा गावातील रहिवासी तसेच समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सौरभ यांच्या सारख्या अनेक कृषी क्षेत्रातील तरुणांच्या यशामुळे भविष्यात महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात नक्कीच मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतो.