आकोट- संजय आठवले
संपूर्ण भारतात छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजनवादी विचार जनमानसापर्यंत पोहोचविणारे प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी चक्क भट्टीवर तापत असलेल्या तप्त तव्यावर बैठक मांडून दिवसा तालुक्यातील भोंदू संत गुरुदास बाबाच्या दैवी शक्तीचे चिरहरण केले आहे. गरम तव्यावर बसलेल्या स्थितीतील सत्यपाल महाराज यांचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका भोंदू महाराजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये हा महाराज अग्नि लावून गरम झालेल्या तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देत होता. हा व्हिडिओ वायरल होताच सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडिओमध्ये संत गुरुदास महाराज तव्यावर बसून भक्तांना आशीर्वादा सोबतच शिवीगाळ सुद्धा करताना दिसत आहे. मार्डी येथे संत गुरुदास महाराज याचं गोरक्षण असून तेथेच त्याचा आश्रमही आहे. गरम तव्यावर बसण्याच्या आपल्या करामतीबाबत संत गुरुदास महाराज याची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, सदर व्हिडिओ हा महाशिवरात्रीचा असून ही दैवी शक्ती असल्याचा दावा त्याने केला. सोबतच आपण कुठलेही अंधश्रद्धेचे काम करित नाही. दैवी शक्ती प्राप्त होते त्यावेळी आपल्याला कोणतेही भान राहत नाही. ही अंधश्रद्धा नसून हा सारा श्रद्धेचा भाग आहे. मी साधू संत नाही असा दावाही त्याने केला. त्यावर महाराजाचा चमत्कार खरा असेल तर त्याने तो आमच्या समोर सिद्ध करावा. आम्ही ३० लाखाचं त्याला बक्षीस देऊ. नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली होती.
त्यानंतर आता प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी स्वतःच खालून अग्नी लावलेल्या तप्त तव्यावर बैठक मारून गुरुदास महाराजाच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला आहे. तप्त तव्यावर बसण्याच्या स्थितीचे त्यांनी पूर्ण विश्लेषण केले आहे. त्यांनी सांगितले कि, “आपण या तव्यावर पाण्यात भिजविलेला काळा कापड आधीच अंथरलेला आहे. त्यानंतर शरीरावरील सर्व कपडे ओले केलेले आहेत. आणि मग तप्त तव्यावर ठाण मांडले आहे. अशा व्यवस्थेमुळे बराच काळपर्यंत आपण तप्त तव्यावर बसून राहू शकतो.” हा प्रकार कोणतीही दैवी शक्ती अथवा चमत्कार नसून ही केवळ हातचलाखी असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी अशा भोंदू बाबांपासून सावधान राहण्याचा संदेशही दिला आहे. सत्यपाल महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर हल्ली तुफान व्हायरल होत आहे.