Monday, December 23, 2024
Homeराजकीयसरपंचाला भोवले वनविभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करणे...रामटेक तालुक्यातील शिवनी (भों.) येथील सरपंच...

सरपंचाला भोवले वनविभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करणे…रामटेक तालुक्यातील शिवनी (भों.) येथील सरपंच अपात्र घोषित

राजू कापसे,रामटेक

शिवनी : रामटेक तालुक्यातील शिवनी (भों) येथील गटग्रामपंचायतचे सरपंच विजय गुलाब भुरे यांचे भाऊ पुरुषोत्तम गुलाब भुरे यांनी वनविभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून जोत केली. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलमान्वये अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी सरपंच विजय भुरे यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित केल्याचा आदेश पारित केला. त्यामुळे आता रामटेक तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मौदा तालुक्यातील अडेगांव येथे शिवनी (भों) येथील सरपंच विजय गुलाब भुरे यांची वडीलोपार्जित शेती आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत गुलाब भुरे यांच्या कायदेशीर वारसानांचे नाव महसूल अभिलेखात फेरफार करण्यात आले. मौजा अडेगांव येथे असलेल्या वडीलोपार्जित शेतीला लागून वनविभागाची शासकीय जागा आहे. सदर जागेवर सरपंच विजय भुरे यांनी अतिक्रमण केल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलमाद्वारे सरपंचाचे पद रद्द करण्याचे प्रकरण हिम्मत फत्तु गोडाकाडे रा. किरणापुर यांनी (ता. २३/०३/२०२२) रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले होते. त्याचप्रमाणे याबाबतची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक यांच्याकडे देखील केली होती. वनविभागाच्या चौकशी अहवालात सरपंच विजय भुरे आणि भाऊ पुरुषोत्तम भुरे यांनी त्यांच्या शेताला लागून असलेल्या वनविभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून धान पिकाची लागवड केली. त्यानुसार त्यांचेवर वनगुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सरपंच विजय भुरे यांनी विहित अपात्रता टाळण्यासाठी खोटे विधाने करीत अतिक्रमीत जमीन त्याच्या भावाच्या वाट्याला आहे. भाऊ पुरुषोत्तम भुरे हे त्यांच्या कुटुंबियासह वेगळे राहत असून ते माझ्या कुटुंबातील सदस्य नाही. तसेच सदर अतिक्रमीत जमीन शिवनी (भों.) च्या हद्दीत नाही. वनविभागाने त्यांच्यावर दंड ठोठावून तडजोड करीत अतिक्रमण निष्काशीत करण्याचे आदेश दिले होते.

तक्रारदार हिम्मत गोडाकाडे यांच्यातर्फे वकील भोजराज धंदाळे यांनी साक्ष पुराव्यासह बाजू मांडली. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायलयाने याबाबतचा तहसीलदार रामटेक आणि मौदा तसेच वनविभाग रामटेक, सचिव, पंचसमक्ष यांचा मौका चौकशी अहवाल मागितला. शेत सर्व्ह क्र. ३०८ लगत असलेल्या वनविभागाचे शेत सर्व्ह क्र. ३०६ मध्ये २.२९ हेक्टर आर. क्षेत्रावर पुरुषोत्तम भुरे यांचे अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाले. मात्र मौका चौकशी दरम्यान लगतचे कास्तकार यांनी दिलेल्या साक्ष बयाणावरुन सरपंच विजय भुरे यांनी शेत सर्व्ह क्र. ३०६ वनविभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याचे निष्पन्न झाले. तहसीलदार मौदा, वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक यांनी सादर केलेल्या मौका चौकशी अहवालावरून सरपंच विजय भुरे आणि त्यांचे रक्त नात्यातील संबंधित भाऊ पुरुषोत्तम भुरे यांनी वनविभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून जोत केली. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलमान्वये शिवनी (भों.) येथील सरपंच विजय गुलाब भुरे यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी पारित केला.

सदर प्रकरणाबाबत ग्रामसेवक मोरेश्वर शेंडे यांना विचारणा केली असता यावर काहीही बोलण्यास टाळले. तसेच सरपंच विजय भुरे यांना संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही.


RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: