सांगली – ज्योती मोरे
सिनेमा अंतरंगात घर करणारं प्रभावी माध्यम. संस्कार करणारं परिणामकारक आणि तितकंच दिशादर्शक माध्यम. जगण्याच्या खोल तळाशी नेणारं अमर्याद माध्यम. सागरासारखी अथांगता लाभलेलं विराट व्यापक माध्यम.अलीकडच्या काळात पटकथा आणि मांडणीवरून आपला सिनेमा तळागाळात पोचवणारा व आटपाडी नाईट चित्रपटाला झी गौरव पुरस्कारात तब्बल 6 पुरस्कार मिळवणारा एक दिग्दर्शक लक्षवेधी ठरला.
तो काळाच्या पटलावर आपल्या पावलांचे स्थान भक्कम करणारा दिग्दर्शक म्हणजे नितीन सिंधुविजय सुपेकर. आटपाडी नाईट या सिनेमाच्या यशानंतर नितीन सुपेकर “सरला एक कोटी”नावाचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. आरती चव्हाण यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
“सरला एक कोटी” भन्नाट कॉमेडी असलेला आणि त्याचबरोबर महिला सबलीकरणाचा संदेश पेरणारा सिनेमा असणार आहे.तगडं स्टारकास्ट असलेला हा सिनेमा एक भन्नाट विषय घेऊन आपल्यासमोर येतोय. इशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, या तगड्या स्टारकास्ट सोबतच सांगलीचा यशपाल सारनाथ मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तसेच सांगलीचा विशाल शिरतोडे ही सिनेमात छोट्या भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमाचं संगीत विजय गवांडे यानी केलं आहे , तसेच गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं व अजय गोगावले व आर्या आंबेकर यांनी गायलेल” केवडयाच पान तू “हे सिनेमाचं गीत ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल आहे.