अमरावती – दुर्वास रोकडे
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात गुरूपौर्णिमा निमित्त एक विषेश कार्यक्रम विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी विद्याथ्र्यांना उपदेश करतांना डॉ. अंबादास घुले, डॉ. वैभव मस्के आदींनी भारतीय गुरू-शिष्य परंपरा यावर आपले विचार व्यक्त करतांना प्राचीन गुरूकुल, गुरू-शिष्य आणि ज्ञानप्रवाह परंपरा ही जगाला भारताने दिलेली देणं असून जो ज्ञान देतो, जगण्याचा सकारात्मक मार्ग दाखवितो, तो गुरू आणि शिक्षक हा या प्रवाहाचा उगम असतो आणि त्याचे समाजात श्रेष्ठ स्थान असते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, गुरू मनुष्य जीवनाला शैक्षणिक, सामाजिक आकार देत असतो. संत गाडगे बाबा यांनी समाजाला त्यागाची भूमिका शिकविली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांानी जगण्याचा सात्विक संदर्भ माणसाला दिला, तर डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी सामाजिक भानाबरोबरच मानवता शिकविली. त्यामुळे त्यांचे स्थान गुरू-शिष्य परंपरेत महत्वाचे मानले जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अर्चना ढोरे यांनी, संचालन प्रा. झुबेर खान, तर आभार प्रा. भावना गव्हाळे यांनी मानले कार्यक्रमाला विभागातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.