पातुर – निशांत गवई
शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कौशल्याचा विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ पातूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन पातुर येथे करण्यात आले होते.
‘रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज’ हा या स्पर्धेचा विषय होता व ही स्पर्धा वर्ग ५ ते १० मध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये वर्ग सहावी मध्ये शिकत असलेला संकल्प शंकर गाडगे याने किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल पातूरचे प्रतिनिधित्व करीत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल संकल्पला रोख ५००० रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संकल्पनेआपल्या वक्तृत्व शैलीतून शिवाजी महाराजांचा इतिहास प्रभावी पद्धतीने मांडला व सर्व शिवभक्तां मध्ये नवचैतन्य निर्माण केले.
शिवाजी महाराजांच्या जीवनातील थरारक प्रसंगाचे वर्णन करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहासाचा प्रत्येय शिवभक्तांच्या डोळ्यासमोर उभा केला.आज शिवाजी महाराजांच्या आदर्शाची समाजाला अत्यंत गरज आहे असे आपल्या वक्तृत्वातुन सांगितले. या स्पर्धेचे उत्कृष्ट सुत्रसंचालन गोपाल गाडगे यांनी केले व या स्पर्धेला प्रशिक्षक म्हणून प्रा.विलास राऊत,प्रा.अरविंद भोंगळे,प्रा.मुकुंद कवाडकर आदींनी काम पाहिले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते.