मुंबई दि 3: संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थींसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य ऋतुराज पाटील, डॉ. राहुल पाटील, हसन मुश्रीफ, पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील निराधार, अपंग आदींच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने केलेल्या योजना याबाबतच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. राठोड म्हणाले की, विशेष सहाय्य योजनेकरिता असलेले निकष, अटी व अर्थसहाय्याची रक्कम याकरिता सर्व योजनेतील पात्र लाभार्थींना अर्थसहाय्याची रक्कम अदा करण्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 3 हजार 558 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष खर्च झाला आहे. लाभार्थींना फेब्रुवारी व मार्च 2023 या महिन्यांचे लाभार्थींना अर्थसहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सुरु आहे.ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा केंद्र शासनाप्रमाणे 65 वरुन 60 करणे, कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविणे, तसेच अनुदान वितरित करण्याबाबतचे निकष बदलणे, अर्थसहाय्यात वाढ करणे याबाबी अभ्यासण्यासाठी एक समिती तयार करण्यात येईल, असेही मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.