सांगली – ज्योती मोरे.
सांगली येथील नवहिंद प्रतिष्ठान तर्फे आयोजित धर्मवीर जन्मोत्सवात दुसरा दिवस पैठणीच्या खेळाने गाजला. पुष्पा भिमराव माने, सोनाली सचिन शिंदे, करूणा प्रकाश चव्हाण यांनी अनुक्रमे पहिल्या तीन पैठणी पटकाविल्या.
लोकप्रिय युवा अभिनेते पार्थ निशांत घाटगे यांच्या आणि टीम तेंडल्याच्या सदस्यांच्या हस्ते विजेत्या प्रथम तीन आणि शंभर विविध टप्प्यावर यश मिळवलेल्या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभोराज काटकर, ज्येष्ठ नेते पंडितराव बोराडे, अशोक तांवशी, निवृत्त आयकर अधिकारी अशोक पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हास्यगंध या एकपात्री विनोदी कार्यक्रमाचे सादरीकरण आणि पैठणीची स्पर्धा वृषभ आकिवाटे यांनी घेतली. यावेळी महिलांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत अंतिम पायरीपर्यंत कडवी झुंज दिली. कार्यक्रमात उत्कृष्ट वेशभुषा पुरस्कार प्रणाली पाठक यांनी पटकावला. सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
आज गोंधळ आणि व्याख्यान दरम्यान विचार पिठावर उभारलेली भव्य तुळजा भवानी मातेची 20 फुटी प्रतिकृतीची पारंपरिक पूजा म्हणून सायंकाळी साडे पाच वाजता मिरजेचे प्रसिध्द सदाशिव पवार आणि त्यांचे संबळ वादक पुत्र अवधूत पवार यांच्या गोंधळ आणि महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवी भक्तांनी दोन्ही पर्वणीचा लाभ घ्या असे आवाहन प्रतिष्ठानच्या महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता ख्यातनाम वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांना सांगलीकर जनतेने भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी केले आहे.