सांगली – ज्योती मोरे
सांगली: श्री महाराज पंचतत्व सेवा प्रतिष्ठानच्यावतीने यंदा 25 जानेवारी रोजी तिसरे पंचतत्व ललितकला संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनात पंचतत्व सेवा पुरस्कारांचे वितारण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी दिली.
ते म्हणाले, या संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका समिता गौतम पाटील आहेत, तर शाहिर देवानंद माळी यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मुकूंद फडणीस हे स्वागताध्यक्ष असून बालमित्र सुरेश कोरे व डॉ. शाम गुरव हे प्रमुख अतिथी आहेत.
या संमेलनामध्ये डॉ. चेतन सूर्यवंशी यांना वायूदेवता आरोग्य सेवा पुरस्कार, सुमित साळुंखे यांना जलदेवता कला सेवा पुरस्कार, प्रा. सचिन पाटील यांना अग्निदेवता समाजसेवा पुरस्कार, रविंद्र कुलकर्णी यांना आकाशदेवता रंगभूमीसेवा पुरस्कार आणि शशिकांत ऐनापूरे यांना पृथ्वीदेवता वसुंधरा सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या संमेेलनामध्ये नृत्य,नाट्य, गायन, वादन, कवितावाचन इत्यादी ललितकलांचे सादरीकरण होणार आहे. संमेलन कर्नाळ रस्त्यावरील पंचतत्व मंदिर परिसरात 25 रोजी सायं 3.30 वा होणार आहे.