रामटेक – राजु कापसे
रामटेक नगराचा विजयादशमी उत्सव नुकताच उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रांत सहसेवा प्रमुख उमेशजी मेंढे यांची प्रेरक उद्बोधन झाले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील युवा व्यावसायिक गजेंद्र ईखार तथा विभाग संघचालक जयंतराव मुलमुले, तालुका संघ चालक जयदेवराव डडोरे उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विजयादशमीपासून आपल्या शताब्दी वर्षात प्रवेश करीत आहे. देशप्रेम, राष्ट्र प्रथम आणि हिंदू समाजाचे संघटन हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर हेडगेवारांनी अवघ्या चार-पाच बाल स्वयंसेवकांना सोबत घेऊन केली.
समाजाच्या हितासाठी राष्ट्रीय अस्मितेसाठी काम करणारा संघ आज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे संघटन म्हणून काम करीत आहे. समाजाच्या सर्व अंगांमध्ये संघ विचारांची प्रेरणा घेऊन स्वयंसेवक विविध क्षेत्रात काम करीत आहेत.
चाळिसच्या वर विविध संघटना आहेत. ज्या हिंदुत्व विचार घेऊन खंबीरपणे उभ्या आहेत आणि समाजाला देशाला दिशा देण्याचे काम करीत आहे. असे प्रतिपादन याप्रसंगी उमेशजींनी केले.
स्थापनेपासून तीन बंदी लादल्या गेल्या नंतरही संघ कार्य कमी न होता अधिक क्षमतेने कार्य करीत आहे. अधिक तावून सुलाखून तेजाने उजळून वर्धिष्णु उभा आहे. कोणतीही आपत्ती असो स्वयंसेवक सर्वप्रथम सेवाकार्यासाठी पोहोचतात. संपूर्ण भारतभर एक लाखावर सेवा प्रकल्प सुरू आहेत.
आज शताब्दी वर्षात संघ स्वयंसेवकांनी पंचसूत्री पालन करण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. आज समाजात नकारार्थी विचारांचे प्रक्षेपण सुरू आहे समाज जाती जातीत विभागण्याचे, भांडण लावण्याचे षडयंत्र सुरू आहे. स्वयंसेवकांनी अशा विचारांविरोधात सजगपणे समर्थपणे सकारात्मक विचार समाजात मांडले पाहिजे, असे मत या प्रसंगी उमेशजींनी मांडले.
प्रमुख पाहुणे गजेंद्र ईखारयांनी संघाच्या योगदानाची चर्चा करताना संघाने गोवा स्वातंत्र्यलढ्यात तसेच दादरा दीव दमन स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान सोयीस्करपणे लपवले गेल्याचे सांगितले. संघाचा विचार समाज तोडणारा नसून समोर जोडणारा आहे. मी या मंचावर येऊन स्वतःला भाग्यशाली समजतो असे मत मांडले.
यावेळी तरुण स्वयंसेवकांनी दंड, समता, दंड युद्ध, योगासन आदी प्रात्यक्षिक सादर केले. प्रास्ताविक परिचय नगर कार्यवाह भूषण नानोटे यांनी केले. अमृतवाचन जय रणदिवे, वैयक्तिक गीत मधुर अवथरे, सांघिक गीत अथर्व चिंचोलकर यांनी सादर केले. रामटेक नगरातील माता भगिनी आणि अनेक गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.