बाळापुर – सुधीर कांबेकर
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात सततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बाळापुर व पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे सर्वे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून सततधार पाऊस सुरू आहे. सलग तीन आठवड्यांपासून सूर्यदर्शन नाही. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे शेतामध्ये असलेली पिके पिवळी पडायला लागली आहेत. सततच्या पावसामुळे मशागतीची कामेही करता येणे शक्य नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके सडली आहेत.
अनेक शेतांमध्ये जाऊन संदीप पाटील यांनी स्वतः नुकसानीची पाहणे केलेली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता शासनाकडून शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे सर्वे तातडीने पूर्ण करण्यात यावेत. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना राज्य शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी संदीप पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे