अकोला – गेल्या 25 वर्षांपासून अकोला जिल्ह्याच्या आणि विशेष करून बाळापुर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारे सर्वसामान्यांचे नेते संदीप पाटील यांनी घरवापसी करीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, शिवाजीराव गर्जे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण, उमेश पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी देवगिरी निवासस्थानी संदीप पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर बाळापूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमांबाबत यावेळी ना. अजित पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन करून चर्चा केली.
संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील घरवापसीमुळे आता निवडणुकांच्या तोंडावर बाळापूर विधानसभा मतदार संघातील आणि एकंदरीत जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संदीप पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावे अशी राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचीही गेल्या अनेक दिवसांपासून इच्छा होती. त्यामुळे या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद निर्माण झाला.
गेल्या काही दिवसांपूर्वी बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बारामती येथे कृषी अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते. या दौऱ्यात संदीप पाटील यांचा देखील समावेश होता. यावेळी ना. अजित पवार यांनी वेळ काढून या संचालक मंडळाशी आणि संदीप पाटील यांचेशी चर्चा केली होती. तेव्हापासूनच संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादीतील घरवापसीचे संकेत मिळाले होते व तशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. अखेर ही घरवापसी झाल्याने कार्यकर्त्यांनी संदीप पाटील यांचे मनापासून स्वागत केले आहे.
सन 2014 पर्यंत संदीप पाटील आणि ना. अजित पवार यांचे घनिष्ठ राजकीय नाते होते. अजित पवारांचे अकोला जिल्ह्यातील सर्वात विश्वासू नेते म्हणून संदीप पाटील यांची ओळख होती. पण 2014 मध्ये घडलेल्या एका राजकीय घडामोडीमुळे संदीप पाटील यांना राष्ट्रवादी सोडावी लागली. त्यानंतर त्यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक शिवसंग्रामकडून लढविण्याचा निर्णय घेतला.
शिवसंग्रामचे राष्ट्रीय नेते स्व. विनायकराव मेटे यांनी देखील संदीप पाटील यांना शिवसंग्रामकडून बाळापुर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. तेव्हा शिवसंग्रामची भाजपसोबत युती होती. त्यामुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप व शिवसंग्राम युतीच्या माध्यमातून संदीप पाटील यांचा विजय निश्चित होता.
परंतु यावेळी देखील काही स्थानिक राजकीय कुरघोड्या झाल्या. त्यामुळे संदीप पाटील यांना ही निवडणूक अपक्ष म्हणून लढावी लागली. या निवडणुकीत संदीप पाटील विजयी होऊ शकले नसले तरीही त्यांनी आपले राजकीय अस्तित्व आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातील आपली फकड या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिली होती.
स्व. विनायकराव मेटे यांचे अत्यंत विश्वासू असल्याने संदीप पाटील यांच्याकडे शिवसंग्रामच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. ती संदीप पाटील यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली. मात्र पुढे विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने संदीप पाटील यांना शिवसंग्रामही सोडावा लागला. जेमतेम वर्षभरापूर्वी त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला. जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सुद्धा सोपविण्यात आली.
परंतु या पक्षातील जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती आणि वर्षभरात आलेले अनुभव लक्षात घेता कार्यकर्त्यांनीच संदीप पाटील यांना वेगळा व योग्य निर्णय घेण्याबाबत तगादा लावला होता. कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन आणि अजित पवार यांचा अजूनही कायम असलेला विश्वास लक्षात घेऊन तसेच आठवडाभरापूर्वी बारामती येथील दौऱ्यात अजित पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतर संदीप पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार बुधवार 17 जानेवारी रोजी संदीप पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बाळापुर विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र काही वेगळे असेल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. संदीप पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घर वापसी ही आ. अमोल मिटकरी यांच्या प्रयत्नातून झाली आहे.
दोन्ही शिवसेनेला बसणार फटका
संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील घरवापसीमुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला संदीप पाटील यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा एक मोठा गट शिंदे गटातून आपोआपच बाहेर पडणार.
तर दुसरीकडे महायुतीमध्ये बाळापूर विधानसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस साठी मिळाली तर संदीप पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. तसे झाले तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्याही अडचणी वाढू शकतात. बाळापुरची जागा राष्ट्रवादीसाठी नाही सुटली तरी संदीप पाटील महायुतीच्या उमेदवारासोबत राहणार असल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला विधानसभेची येणारी निवडणूक जड जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आगामी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद दिसेल – संदीप पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आपल्यावर विश्वास टाकून पुन्हा एकदा आपल्याला अकोला जिल्ह्यात काम करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करून बाळापुर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद वाढविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. आगामी सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय शक्ती दिसून येईल, असा विश्वास संदीप पाटील यांनी या निमित्ताने व्यक्त केला.