Sunday, November 17, 2024
Homeराज्यइलोक्टोरल बाँड हप्तावसुलीचाच प्रकार, भाजपा सरकारचे स्पष्ट धोरण ‘चंदा दो, धंदा लो’...

इलोक्टोरल बाँड हप्तावसुलीचाच प्रकार, भाजपा सरकारचे स्पष्ट धोरण ‘चंदा दो, धंदा लो’ :- जयराम रमेश…

ईडी, आयकर विभागाची कारवाई व कंत्राटे मिळालेल्या कंपन्यांकडून इलेक्टोरल बाँडची खरेदी.
इलेक्टोरल बाँड स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा.

निवडणूक आयोग इंडिया आघाडीच्या प्रतिनिधींना भेटत का नाही ? कोणाचा दबाव आहे आयोगावर…?

भारत जोडो न्याय यात्रेतून ५ साल, ५ न्याय आणि २५ गॅरंटी…

वाडा (पालघर) – इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून ६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कारवाई झाली त्या कंपन्यांनी कारवायानंतर इलेक्टोरल बँड घेतले आहेत त्याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला हे स्पष्ट आहे.

तसेच ज्या कंपन्यांना मोठ्या कामाची कंत्राटे मिळाली त्या कंपन्यांनीही हे बाँड खरेदी केले आहेत. इलेक्टोरल बाँड हा सरळ सरळ हप्तावसुलीचा प्रकार आहे. भाजपाचे धोरण स्पष्ट आहे, ‘चंदा दो, धंदा लो’, असा घणाघाती हल्ला अखिल भारतीय काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला.

पालघर जिल्ह्यातील वाडा येथील पत्रकार परिषदेला जयराम रमेश संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले की, इलेक्टोरल बाँड हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून धमकी देऊन हप्ता वसूली केल्याचा हा प्रकार आहे.

इलेक्टोरल बाँड खरेदीमध्ये शेल कंपन्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. ज्या कंपन्यांना रस्ते, भुयार, यासारखी मोठ्या किमतीची कंत्राटे मिळाली त्या कंपन्यांनी हे बाँड घेतले आहेत.

कामाच्या बदल्यात इलेक्टोरल बाँड हे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही यादी जाहीर केली असली तरी त्यात आणखी माहिती प्रकाशित होण्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निर्देशानंतर जी माहिती बाहेर येईल त्यातून कोणत्या कंपनीकडून कोणत्या पक्षाला किती पैशाचा लाभ झाला हेही स्पष्ट होईल.

ईव्हीएम संदर्भात इंडिया आघाडी मागील १० महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे भेटण्यास वेळ मागत आहे पण आयोग वेळ देत नाही. ईव्हीएमबरोबर व्हिव्हिपॅटचा उपयोग करावा ही इंडिया आघाडीची मागणी आहे.

आयोगाला भेटून एक निवदेन देण्याचा प्रयत्न आहे परंतु निवडणूक आयोग भेटतच नाही. निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे का? असा सवाल करत हे लोकशाहीला धोकादायक आहे, असेही जयराम रमेश म्हणाले.

भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरच्या इम्फाळपासून मुंबईपर्यंतची ६७०० किमीची यात्रा देशाच्या भवितव्यासाठी परिवर्तनकारी ठरेल. ही वैचारिक यात्रा आहे आणि अशाच पद्धतीच्या यात्रा राज्याराज्यात तसेच जिल्हा स्तरावर होत राहतील. विचारधारेत स्पष्टता येण्यासाठी तसेच जनतेशी संवाद साधण्यासाठी यात्रा महत्वाची आहे.

यात्रा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह व ऊर्जा निर्माण करण्यासाठी मोलाची ठरली आहे. नफरत परवणाऱ्या विचारधारेला ५ साल, ५ न्याय आणि २५ गॅरंटी मधून उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात नंदूरबारपासून सुरु झालेली यात्रा उद्या मुंबईत चैत्यभूमीवर समाप्त होईल असे जयराम रमेश म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: