कोषागार कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाची उदासीनता…
पातूर – निशांत गवई
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असलेल्या १८ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोषागार कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाच्या निष्क्रिय पणामुळे त्यांचे हे वेतन थकले असल्याचा आरोप होत असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष देऊन कारवाई करावी अशी अपेक्षा वैद्यकीय अधिकारी करीत आहे.
राज्यात प्रथम क्रमांकाची असलेली अकोला जिल्हा परिषदेचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे. विविध घोटाळे आणि अन्य बाबींनी या जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत चालली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ३८ प्राथमिक केंद्रात कार्यरत असलेल्या १८ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांचे वेतन गेल्या चार महिन्यांपासून थकले असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्वी या अधिकाऱ्यांचे वेतन हे पंचायत विभागातून व्हायचे परंतु शासनाच्या नवीन प्रणालीमुळे आता त्यांचे वेतन हे महकोष मधून केल्या जाते.
नवीन प्रणाली आल्याने वेतन प्रक्रिया ही जास्तीत जास्त एक किंवा दोन महिने प्रभावित होऊ शकते मात्र इथे या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन तब्बल चार महिन्यांपासून थकले असल्याने जिल्हा कोषागार आणि जिल्हा परिषद प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.
तब्बल चार महिन्यांपासून वेतन थकल्याने या अधिकाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून वेतनाविना काम करावे तरी कसे असा फार मोठा यक्ष प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकरणी आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून कारवाई करावी अशी तोंडी अपेक्षा प्रभावित वैद्यकीय अधिकारी करीत आहे.