आकोट – संजय आठवले
रोज रात्री दारू पिऊन कलह केल्याखेरीज निद्राधीन न होणाऱ्या मध्यधूंद पित्याने क्षुल्लक घरगुती कारणावरून आपल्याच कर्त्या मुलाची हत्या केल्याची घटना शहरातील धुळे प्लॉट अंजनगाव मार्ग या परिसरात घडली आहे. आकोट शहर पोलिसांनी हत्यार्या पित्यास तातडीने अटक केल्यावर आकोट न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
शहरातील धुळे प्लॉट अंजनगाव मार्ग येथे बाळू ठाकरे हा आपले कुटुंबासह राहावयास आला. त्याचे मूळ गाव करोडी हे आहे. उपजीविकेकरिता आकोट शहरात त्याने आश्रय घेतला. याच ठिकाणी त्याची दोन तरणी मुले मरण पावली. धनंजय हा बाळूचा वडील मुलगा. तो विवाहित असून त्याला तीन मुले आहेत.
मिळेल ते काम करून हा परिवार आपली उपजीविका चालवायचा. परंतु बहुतांश सामान्य परिवाराला असलेला दारूच्या व्यसनाचा अभिशाप बाळू आणि धनंजय यांचेही वाट्याला आला. त्यामुळे सायंकाळी घरी आल्यावर रोज कलह केल्याखेरीज बाळू ठाकरे याला झोपच येत नव्हती.
धनंजयची तिन्ही मुले चुणचुणीत आणि तीव्र बुद्धी असल्याने या दोन्ही बापलेकांना शेजाऱ्यांनी दारूपासून दूर राहण्याचा सल्ला अनेकदा दिला. परंतु त्यांचेवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अशातच दि.११ जानेवारीचे रात्री धनंजय कामावरून आल्यावर घरात लवंडला होता.
तितक्यात त्याचा पिता बाळू मद्यधुंद होऊन घराकडे निघाला. जाता जाता “आज त्याला कापूनच टाकतो” असे तो बरळत होता. त्याचे हे वर्तन नित्याचेच असल्याने शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नशेत भेलकांडतच बाळू आपल्या घरात घुसला.
घरात गेल्यावर त्याची पत्नी अर्थात धनंजयची आई हिचेशी तो भांडू लागला. आरामात व्यत्यय होत असल्याने धनंजयने उठून दोघांना समजावण्याचा प्रयास केला. परंतु बाळू जणू त्या दिवशी धनंजयला संपविण्याचेच तयारीने आला होता. त्याने अत्यंत धारदार असलेले पाते हातात घेऊन थेट धनंजयच्या गळ्यावर वार केला.
हा वार इतका जबरदस्त होता कि, एका वारातच धनंजयच्या कंठातून रक्ताची धार आणि त्यातील गोळा बाहेर पडला. त्याने धनंजयचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून घरातील सर्वांनीच रडणे ओरडणे सुरू केले. ते पाहून बाळू तिथून पसार झाला.
घटनेची खबर आकोट शहर पोलिसांना मिळताच ठाणेदार तपन कोल्हे, पो.उ.नि. राजेश जवरे हे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बाळूचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले. त्याचेवर रीतसर गुन्हा दाखल करून दुसरे दिवशी त्याला आकोट न्यायालयात हजर केले न्यायालयाने हत्यारा पिता बाळू ठाकरे याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार तपन कोल्हे हे स्वतः करीत आहेत. घरातील कर्ता पुरुष धनंजयच्या अशा अवचित जाण्याने त्याची तीन अपत्ये व त्याची आई यांची जबाबदारी त्याचे पत्नीवर आली असून याबाबत परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.