Monday, December 30, 2024
Homeराज्यभक्तांच्या उद्धारासाठी गावोगावी भ्रमंती करणारे आणि अनेक चमत्कार करून भक्तांची श्रद्धा वाढवणारे...

भक्तांच्या उद्धारासाठी गावोगावी भ्रमंती करणारे आणि अनेक चमत्कार करून भक्तांची श्रद्धा वाढवणारे संत श्री गजानन महाराज..!

माघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, म्हणजेच २३.२.१८७८ या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव (जिल्हा बुलढाणा) येथे प्रकट झाले. त्यांची दृष्टी पूर्णतः अंतर्मुख होऊन नासिकाग्रावर स्थिर झालेली होती.

नेहमीच दिगंबर अवस्थेत असणार्‍या महाराजांना कुणी कपडे घातलेच, तर ते लगेच काढून फेकून देत किंवा गर्दीतील लोकांना वाटून टाकत असत. त्यांच्या आरंभीच्या वेशानुसार त्यांच्या अंगात जुनी बंडी, हातात कमंडलूसारखा भोपळा आणि स्वहस्ते सिद्ध केलेली कच्च्या मातीची एक चिलीम होती.

महाराजांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रक टिपू न शकणे!
त्यांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रक (कॅमेरा) टिपू शकला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रत्येक वेळी काढलेले त्यांचे छायाचित्र वेगळेच निघायचे; म्हणून महाराजांचे एकही छायाचित्र दुसर्‍या छायाचित्राशी जुळत नाही.

प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला!
त्यांच्या या शिकवणुकीची आवश्यकता आज भासतच आहे. संत किती द्रष्टे असतात ? याचीच ही प्रचीती आहे.

विविध विषय आणि विविध भाषा अवगत असणे!

महाराजांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आदी भाषा अवगत होत्या, तसेच सर्व विषयांचे ज्ञानही होते. समोरच्या व्यक्तींची योग्यता ओळखून महाराज त्या व्यक्तीशी संभाषण करत असत.

खरा जिज्ञासू समोर आल्यास त्याची जिज्ञासा त्यांच्याकडून शमवली जात असे. कला आणि संगीत यांचीही त्यांना आवड होती. ते विविध रागांत स्वतः भजने आणि पदे म्हणत असत. त्यांना गातांना पाहून खरा गायकही प्रभावित होत असे. त्यांचा वेद आणि ऋचा यांचाही दांडगा अभ्यास होता.

महाराजांच्या आवडत्या गोष्टी

भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे । चंदन, चावल, बेलकी पातियां शिवजीके माथे धरो रे ॥

हे संत मीराबाईचे पद महाराजांना फारच आवडायचे. हेच पद ते सतत म्हणायचे. महाराजांना लाकडी पलंगावर बसायला फार आवडत असे; म्हणून शेगावी त्यांचा हा पलंग संस्थानाकडून भक्तांच्या दर्शनार्थ ठेवला आहे. ‘गण गण गणांत बोते’ असे ते सतत गुणगुणायचे; म्हणूनही लोक त्यांना गजानन महाराज असे म्हणतात.

भक्तांच्या उद्धारासाठी गावोगावी भ्रमंती करणे आणि साक्षात्कार घडवणे!

भक्तांच्या उद्धारासाठी त्यांची गावोगावी सारखी भ्रमंती चालूच असायची. कुणीही त्यांना आपल्या घरी थांबवून ठेवू शकत नसे. त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनात अनेक चमत्कारांचा अनुभव अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे.

दुखण्यातून बरे करणे, कोरड्या विहिरीला पाणी आणणे, कावळ्यांना पुन्हा न येण्यास सांगणे, आगगाडी रोखून धरणे, भक्तांना नर्मदा नदीचे दर्शन घडवणे, महारोग्याचा रोग बरा करणे, द्वाड गाय आणि घोडा यांना शांत करणे,

भक्तांना विठ्ठलाचे अन् रामदास स्वामींचे दर्शन घडवणे, पितांबर या शिष्याचा उद्धार करणे, वाळलेल्या आंब्याच्या झाडास हिरवी पाने आणणे, जळत्या पलंगावर बसणे, मधमाशांनी चावा घेऊनही अंग सुरक्षित असणे, ब्रह्मगिरीच्या गोसाव्याचे गर्वहरण करणे, ऊसाच्या काठीचा मार सहन करणे, पहिलवानाला पाय उचलू न देणे,

चिलीमसमोर नुसती काडी धरताच चिलीम पेटणे, असे चमत्कार भक्तांनी अनुभवले आहेत. त्यांनी असे चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तीमार्गाचे महत्त्व पटवून दिले. शेगावी जाताच श्री महाराजांच्या चरणी मस्तक विनम्र होते! गजानन महाराज की जय असा जयघोष करून लोक स्वतःला धन्य समजतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: