सांगली – ज्योती मोरे
दुःखाला कवटाळून बसू नका. ते घातक कोलेस्ट्रॉल आहे. आनंद वेचा, प्रभू श्री रामाचे नाव आहे. सगळ्यांना आनंद द्या, असे आवाहन प.पू. श्री समाधान महाराज शर्मा यांनी आज रामकथेत केले.
येथील नेमिनाथनगर कल्पद्रूम क्रीडांगणावर आयोजित श्री राम कथा सोहळा आणि नाम संकिर्तनात प्रभू श्रीरामांच्या विवाहानंतर जानकीच्या निरोपाचा प्रसंग त्यांनी उभा केला.
लेकीला निरोप देताना जनक राजाच्या मनाची झालेली अवस्था समाधान महाराज कथन करत असताना स्त्री-पुरुष सर्वांचे डोळे पाणावले. गेल्या पाच दिवसांपासून रामजन्म ते राम-जानकी विवाह सोहळ्याचे आनंदमयी, उत्साही वातावरण होते. आता प्रभू रामांचा वनवास सुरु होतोय, याची जाणीव करून देतानाच महाराजांनी स्वतःही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बाप-लेकीच्या हळव्या नात्यांची कथा सांगत त्यांनी पालकांना कडू डोसही पाजले.
ते म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांनी मला सांगितलंय, आपण मंदिर कमी बांधू, मात्र प्रत्येक घराला मंदीर बनवण्याचा प्रयत्न करू. श्रीराम चरित्र तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा तोच मानस आहे. घराघरात आयोध्या झाली पाहिजे. घराघरात राम राज्य आले पाहिजे. जातीपातीच्या पलिकडे जावून एकमेकांप्रती प्रेमाने, आदराने वागूया.
सुनेला लेकीसारखं वागवूया आणि सासू-सासऱ्यांना आई-बापासारखं सांभाळूया. रामराज्याची संकल्पना यापेक्षा वेगळी काय करावी. कारण, बाप लेकीसाठी हळवा असतो. आजच्या युगात लेकीचे तुकडे केले जात असताना त्याच्या मनात काय वेदना असतील, हेही समजून घेऊया. मंथन करूया.’’
यावेळी पन्नालाल त्रिवेदी, विश्वासराव गवळी, मनोहर सारडा, लक्ष्मण नवलाई, ओमप्रकाश झंवर, राजेंद्र घोडावत, शामसुंदर तोष्णीवाल, राधाकिसन डोडिया, अनिल मानधना, प्रकाश जाधव, राजशेखर साबळे, जयंत सावंत, रामबीर सागवान, रतनलाल सारडा आदी उपस्थित होते.