नांदेड – महेंद्र गायकवाड
जागतिक ख्यातीचे शीख धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले सचखंड गुरुद्वारा नांदेड च्या कार्यकारणी मंडळाची निवडणूक मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे. या बोर्डाचे सध्या डॉ. विजय सतबीरसिंघ हे प्रशासक आहेत. त्यांना पुढे मुदतवाड न देता निवडणुका घ्याव्यात अशी मागणी स. जगदीपसिंघ नंबरदार यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शिफारसी वरून दि. 29 जून 2022 रोजी डॉ. परविंदरसिंघ पसरिता यांची गुरुद्वारा बोर्ड प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. पसरिच्या यांचेवर 2008 गुरुतागदी काळामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप असताना देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
डॉ. पसरीच्या यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये चुकीच्या पद्धतीने अनेक निर्णय घेऊन नियमितता व गैरवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांना 02 ऑगस्ट 2023 रोजी प्रशासकपदी नियुक्ती केली. यावर समुदायाकडून आक्षेप आल्याने दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी डॉ. विजय सतबीरसिंघ यांची बोर्ड प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती करण्यात आल्यापासून बोर्ड अध्यक्षांनी ठोस निर्णय व कोणतेही मोठे काम केल्याचे दिसून येत नसल्याने त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी महसूल विभागाचे मुख्य सचिव यांना निवेदनाद्वारे केली आहे.