आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मागणीला उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद : तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना
सांगली – ज्योती मोरे
महापालिका क्षेत्रासह कृष्णा व वारणा नदीकाठच्या भागातील महापूर व अतिवृष्टीमुळे वारंवार खराब होणारे रस्ते सिमेंट क्रॉक्रिटचे होणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पूरबाधित रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.
सांगली जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा अंतीम करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली आदी उपस्थित होते.
बैठकित आमदार गाडगीळ यांनी महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्त भागातील रस्ते काँक्रिटीकरणचे करण्याबाबतचा मुद्दा मांडला. पूर तसेच अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागातील रस्ते खराब होतात. दरवर्षी रस्ते करण्यावर मोठा खर्च होतो. हेच रस्ते सिमेंट क्रॉक्रिटचे करावेत.
त्यामुळे दरवर्षी रस्त्यांवर होणारा खर्चही वाचेल अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी फडणवीस यांच्याकडे केली. पालकमंत्री डॉ. खाडे यांच्यासह उपस्थित खासदार, आमदार व अधिकाऱ्यांनीही आमदार गाडगीळ यांच्या मागणीचे स्वागत केले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व पूरबाधित रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले.