अकोला – संतोषकुमार गवई
लोकशाहीत प्रशासनाचे लोकांप्रती मोठे उत्तरदायित्व असते. त्यामुळे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने अधिकाधिक लोकाभिमुख होऊन कामे करावीत व महसूल पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
महसूल पंधरवड्याचा अत्यंत उत्साहात शुभारंभ आज नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीची सुरूवात आज होऊन जिल्हाधिका-यांच्या हस्ते विविध आस्थापनांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, महापालिका आयुक्त सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, महेश परंडेकर, अनिल माचेवाड, कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, महसूल खात्याला मोठी परंपरा आहे.
जमीन महसूलविषयक कामांबरोबरच नैसर्गिक आपत्ती, निवडणूक, पुरवठा, विविध विभागांचा समन्वय, विविध योजनांची अंमलबजावणी अशा अनेकविध जबाबदा-या महसूल विभागाकडून सातत्याने पार पाडल्या जातात. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे सातबारा संगणकीकरण, ई- चावडी आदी उपक्रमांतून प्रशासन अधिक गतिमान झाले आहे. अकोला जिल्हाही ई-चावडीसारख्या उपक्रमांत राज्यात अग्रेसर आहे.
आपल्या कामातून व्यापक लोकहित साधणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत. कामे प्रलंबित ठेवू नयेत. अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यानी केले.
चांगले काम करण्यासाठी चांगले आरोग्य असणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वांनी नियमित आरोग्य तपासणी, व्यायाम, संतुलित जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपवनसंरक्षक श्री. कुमारस्वामी, अपर जिल्हाधिकारी श्री. सिद्धभट्टी आदींनीही मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 98 आस्थापनांनी 981 पदे अधिसूचित केली आहेत. त्याबाबत निवड प्रक्रिया सुरू असल्याचे रोजगार सहायक आयुक्त श्री. शेळके यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपजिल्हाधिकारी श्रीमती भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.