आकोट – संजय आठवले
राज्यभरात साजरा केला जाणाऱ्या महसूल दिनाचे औचित्य साधून आकोट महसूल अधिकाऱ्यांनी युवक युवतींशी संवाद साधून त्यांना अनेक बाबतीत बहुमोल मार्गदर्शन केले. ह्या माहिती द्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महसूल विभागाबाबत महत्त्वपूर्ण माहितीचे ज्ञान झाले.
महसूल दिनाचे निमित्त्याने शहरातील श्री नरसिंग कला आणि वाणिज्य महाविद्यालय तथा महसूल विभाग आकोट यांचे संयुक्त विद्यमाने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. बबीता हजारे, मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ.सुनील चव्हाण, तहसीलदार, आकोट, विजय सवडे ,अप्पर तहसीलदार आकोट, निळकंठ नेमाडे ,मंडळ अधिकारी,दिनेश मोहोकार, संतोषी वानखडे, शैलेश मेतकर ,डॉ. अनिल बाभुळकर, संजय तळोकार आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. यावेळी कु.अर्चना वरठे यांनी सविंधान शपथेचे वाचन केल्यानंतर प्रमुख अतिथिंना ग्रंथभेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
उपस्थिताना प्रमुख मार्गदर्शन करताना तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी महसूल प्रशासनाच्या कामकाजा संदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. उच्चपदस्थ अधिकारी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कसे प्रयत्न करावे याबाबतही त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. परिविक्षाधीन तहसीलदार विजय सवडे यांनी क्यू आर कोड या माध्यमातून महसूल प्रशासनाच्या अनेक बाबी कशा सोयीने प्रत्येकाला हाताळता येतील याबाबत माहिती दिली.सोबतच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी कशी करावी याबाबतही महत्वपूर्ण माहिती दिली.
नीलकंठ नेमाडे, दिनेश मोहोकार सिद्धांत वानखडे यांनीह महसूल प्रशासना संबंधित अनेक बाबींचा सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना परिचय दिला. त्याखेरीज नविन मतदार नोंदणी कशी करावी याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. अध्यक्षीय भाषणातून डॉ. हजारे यांनी महसूल विभागाच्या या सोयींचा सर्वांनी फायदा घेत विद्यार्थ्यांनी स्वयंनिर्भर बनवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात जातीच्या दाखल्यांचे वाटपही करण्यात आले. तसेच क्यु आर कोडच्या प्रतिंचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉ. बाभुळकर यांनी तर आभार कु. गायत्री भटकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ.कैलास कराळे, प्रा.प्रकाश आवंडकर, प्रा.भेलोंडे, प्रा.राठोड, जीनेश फुरसुले, सोनू नेरकर, माधुरी अनासने राहुल तळोकार, पंकज येवले तसेच महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद तथा विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.