Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारी'त्या' प्रकरणाचे विधीमंडळात उमटले पडसाद - घोट वनपरिक्षेत्र उद्यान अवैध मुरुम उत्खनन...

‘त्या’ प्रकरणाचे विधीमंडळात उमटले पडसाद – घोट वनपरिक्षेत्र उद्यान अवैध मुरुम उत्खनन प्रकरण…

विधानपरिषदेत आ. रामदास आंबटकर यांनी वेधले लक्ष

गडचिरोली – आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या घोट वनपरिक्षेत्रातील घोट वनविभागाच्या जैवविविधता उद्यानातून अवैधरित्या हजारो ब्रास मुरुम उत्खनन प्रकरणाचे पडसाद थेट विधानपरिषदेत उमटले आहेत. आ. रामदास आंबटकर यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत शासनाचे लक्ष वेधले. याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत चौकशीअंती तीन महिन्यात यातील दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

आलापल्ली वनविभागांतर्गत येणा-या घोट बिटामध्ये नोव्हेंबर 2022 पर्यंत राखीव वन जैवविविधता उद्यानात वनकर्मचारी, वनाधिका-यांनी एका कंत्राटदाराच्या नावाने स्वत: उत्खनन केलेल्या मुरुमाचा वापर आगार डेपो घोट व इतर रस्ता बांधण्याच्या कामावर केला होता. यात 1100 ब्रास मुरुम अवैधरित्या उत्खनन करुन त्यातील झाडे व वनंसपदा नष्ट केल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्य वनसंरक्षकाकडे तक्रार दाखल केली होती.

त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिका-यांमार्फत सखोल चौकशी करीत दोषी आढळून आलेल्या वनपाल लटारे, पुरुष वनरक्षक धानोरकर व महिला वनरक्षक आतला यांचेसह वनपरिक्षेत्राधिकारी गोन्नाडे यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र केवळ कनिष्ठ कर्मचा-यांवर कारवाई झाल्याने वरिष्ठांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात होते. माध्यमातून वरिष्ठ अधिका-यांचे लक्ष वेधले होते.

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते ताटीकोंडावार यांच्या शासन स्तरावरील सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल आ. रामदास आंबटकर यांनी घेतली. आज, गुरुवारी विधानपरिषेद त्यांनी घोट वनक्षेत्र उद्यानातील मुरुम उत्खनन प्रकरणासंदर्भात वनमंत्र्यांना प्रश्न उपस्थित करीत गौण खनिज या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

याप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत याप्रकरणी वरिष्ठ वनाधिका-यांमार्फत चौकशी समिती गठित करण्यात आली असून येत्या तीन महिन्यात चौकशी पूर्ण होताच संबंधित दोषींवर दंडात्मक शिक्षा प्रस्तावित करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

गौण खनिज माफियांचा बंदोबस्त करा : आ. आंबटकर
वनसंपदेने नटलेला गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उपलब्ध आहे. घोट वनक्षेत्रातील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी आरएफओ, वनपाल, वनरक्षकांवर कारवाई केली असली तरी याला मुकसंमती देणारे वरिष्ठ अधिकारी मोकाट आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी.

तसेच जिल्ह्यातील गौण खनिजावर माफियांची नजर असून राजरोसपणे गौण खनिजाची चोरी केली जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बूडत असून पर्यायाने पर्यावरणाचाही -हास होत आहे. त्यामुळे या माफियांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आ. रामदास आंबटकर यांनी वनमंत्र्यांकडे लावून धरली.

1926 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा : वनमंत्री
आ. आंबटकर यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना वनमंत्री मुनगंटीवार यांनी वनविभाग अतिशय गंभीरपणे कार्यवाही करीत असल्याचे सांगितले. घोट क्षेत्र मुरुम उत्खनन प्रकरणी दोषी आढळून येणा-या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

यासोबतच अवैध गौण खनिज उत्खनन वा वाहतूक संदर्भात माहिती असल्यास वंदे मातरम फॉरेस्ट अंतर्गत 1926 या टोल फ्री क्रमांकावर पर्यावरण प्रेमींनी माहिती द्यावी. तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. तसेच कठोर कारवाई संदर्भात आणखी काही सूचना सांगा त्याची निश्चित अंमलबजावणी केली जाईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मुकसंमती देणारे वरिष्ठ वनाधिकारी मोकाट
घोट वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत अवैध मुरुम उत्खनन प्रकरणासंदर्भात वरिष्ठ स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुराव्याअंती या प्रकरणी मुख्य वनसंरक्षकांनी चौकशीचे आदेश चौकशी अहवालाअंती वनपरिक्षेत्र अधिकारीसह चार वन कर्मचा-यांवर कारवाई केली.

असे असले तरी या सर्व प्रकरणाला मुकसंमती देणारे आलापल्ली वनविभागाचे वरिष्ठ, कनिष्ठ अधिका-यांवर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे या भ्रष्टाचाराला चालना देणा-या संबंधितांवरही कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील अनेक वनविभागात अनागोंदी कारभारातून भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. विशेषत: अहेरी उपविभागातील सर्वच वनपरिक्षेत्र कार्यालयाची सखोल चौकशी अत्यावश्यक आहे.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ता

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: