Sunday, December 22, 2024
Homeराजकीयवाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करा -...

वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करा – नाना पटोले…

नवीन कायद्यामुळे ट्रॅक्टर, दुचाकी वाहन चालवणाऱ्यांनाही भिती.

जुलमी काळा कायदा मंजूर करण्यासाठीच विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांचे निलंबन.

महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत.

मुंबई, दि. १ जानेवारी २०२४ केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

या काळ्या कायद्विरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे, या संपाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, दुचाकी वाहन, टॅक्टर चालवण्यासही चालकांना भिती वाटावी असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा मोदी सरकारने आणला आहे. या कायद्यामुळे स्वताचे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे.

आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर १-२ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड होता पण नवीन कायद्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षा व ७ ते १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता अजामिनपात्र आहे. या कठोर काळ्या कायद्याविरोधात जनतेत जीव्र नाराजी आहे.

हा काळा कायदा मंजूर करून घेण्यासाठीच मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित केले. या काळ्या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून चालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा आहे.

जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मेरिटनुसारच जागा वाटप होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेतूनही भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा परभव करणे हेच काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्य आहे.

भाजपाविरोधात लढणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन ही लढाई लढू ही काँग्रेसची भुमिका आहे असे स्पष्ट करत उलट महायुतीतच जागा वाटपावरून तीव्र मतभेद आहेत, त्यांच्यात भयानक तणाव आहे परंतु भाजपा शेवटी ईडी, सीबीआयचा वापर करुन त्यांना शांत करेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

भारतीय जनता पक्ष अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा राजकीय स्टंट करत आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, अयोध्येत प्रभूरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदु धर्माचे प्रमुख शंकराचार्य यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटले आहे.

अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असून ते पाप ठरेल असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा स्टंट करत आहे का हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट करु नये अशीच बहुसंख्य हिंदुंची भावना आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: