सांगली – ज्योती मोरे.
रवि जाधव फिल्म्स प्रस्तुत, मेघना जाधव निर्मित आणि शेखर बापू ‘रणखांबे दिग्दर्शित ‘रेखा’ या लघुपटाला नुकताच राष्ट्रीय ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक शेखर रणखांबे याने सांगलीतील काही कलाकारांना घेवून सांगलीतीलच परिसरात चित्रीकरण करुन ‘रेखा’ या फिल्मचा जगभर डंका गाजविला आहे.
ही शॉर्टफिल्म सांगली परिसरातील भाजी मंडई, बसस्टॉप आदी परिसरात शुट झाली आहे. तिची गतवर्षी भारतीय चित्रपट महोत्सवगोवा (इफ्फी) येथे अधिकृत निवड झाली. महाराष्ट्र शासनाच्या स्वराज्य लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन पुरस्कार मिळाले.
पुणे येथील आरोग्य फेस्टिवल, द एम्प्टी फिल्म फेस्टीवल, अक्षर मानव लघुपट महोत्सव, अरुणोदय फिल्म फेस्टिव्हल अहमदनगर, प्रतिबिंब फिल्म फेस्टीव्हल, लोकराजा राष्ट्रीय लघुपट महोत्सव असे अनेक महोत्सव या चित्रपटाने गाजवले आहेत. गेल्या महिन्यातच जर्मनीतील बर्लिन फेस्टिव्हलमध्येही यास दोन पुरस्कार मिळाले आहेत. तर स्टुअर्टगार्ड व मेलबोर्न फेस्टीवलसाठीही याची निवड झाली होती.
‘रेखा’ चे छायाचित्रण प्रताप जोशी यांचे असून, संकलन वैभव जाधव, वेशभूषा आणि रंगभूषा मंगेश गायकवाड, ध्वनी संयोजन मंदार कमलापूरकर आणि सचीदानंद टीकम आदींनी केले आहे. तसेच यामध्ये सांगली जिल्ह्यातील माया पवार हिच्यासह तमीना पवार, सत्याप्पा मोरे, वैशाली केंदळे, विशाल शिरतोडे, उमेश मालन, कुलभूषण काटे,
गौतम कांबळे, अनुराधा साळुंखे, गजानन सुर्यवंशी, सुरज वाघमोडे आदींचा सहभाग आहे. तर सांगलीच्याच विक्रम शिरतोडे, लखन चौधरी, किसन चव्हाण, कुलदीप देवकुळे, सचिन ठाणेकर,शाहीर चंद्रकांत गायकवाड आदींनी इतर धूरा सांभाळली आहे.