आकोट- संजय आठवले
अकोला जिल्ह्यातील १४७ कोतवाल पदांची भरती होणार असून या पदांकरिता अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै ही मुक्रर करण्यात आली आहे. २० ऑगस्ट रोजी या पदांची लेखी परीक्षा जिल्हा स्तरावर घेतली जाणार आहे. हे अर्ज प्रत्येक तहसील स्तरावर स्वीकारले जाणार असून हे अर्ज अर्जदारास स्वतः सादर करावे लागणार आहेत. तसेच अर्जदार हा त्याच साझ्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे. परंतु ही अट शिथिल करण्याची मागणी कोतवाल संघटनेचे माजी अध्यक्ष यांनी केली आहे.
अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यां अंतर्गत एकूण १४७ कोतवाल पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील- ३०, आकोट- २७, बाळापुर- २१, मुर्तीजापुर- २२, पातुर- १२, बार्शी टाकळी- २१ व तेल्हारा तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. या ७ ही तालुक्यांच्या तहसील स्तरावर अर्जांचे नमुने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दिनांक २०/७/२०२३ पासून हे अर्ज स्वीकारणे सुरू झाले असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै ही ठेवण्यात आली आहे. हे अर्ज पोस्ट अथवा कुरिअर मार्फत स्वीकारले जाणार नाहीत. अर्थात अर्जदारास आपला अर्ज स्वतः दाखल करावा लागणार आहे. या अर्जाकरिता महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार हा त्याच साझ्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. अन्य साझ्यातील अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जदार त्याच साझ्यातील रहिवासी आहे हे दर्शविणेकरिता ३० जून २०२३ पूर्वीचे आधार किंवा निवडणूक ओळखपत्र, ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी दिलेला दाखला सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करताना मागास प्रवर्गातील अर्जदारास दोनशे रुपये तर खुल्या प्रवर्गातील अर्जदारास चारशे रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क रोखीने भरायचे आहे. या पदांच्या लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ५० प्रश्न प्रत्येकी गुण २ असे राहतील. उत्तर पत्रिका मशीन द्वारे तपासल्या जाणार आहेत. परीक्षेमध्ये मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व स्थानिक जिल्ह्याची माहिती या विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता शासकीय धोरणांन्वये ठरविण्यात येणार आहे. अंतिम निवडीकरीता उमेदवाराने आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास गुणनुक्रमे पात्र असलेल्या पुढील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता दिनांक ११.०८.२०२३ ते १८.०८.२०२३ या कालावधीत प्रत्येक तहसील स्तरावर कार्यालयीन वेळेत प्रवेश पत्रांचे वितरण केल्या जाणार आहेत. त्यानंतर दिनांक २०.०८.२०२३ रोजी अकोला शहरातील विविध ठिकाणी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत ही परीक्षा घेतली जाणार आहे.
या प्रक्रियेमधील “अर्जदार त्याचं साझ्यातील रहिवासी असावा” ह्या अटीवर कोतवाल संघटनेचे माजी अध्यक्ष भाष्कर साळुंके यांनी आक्षेप घेतला आहे. ‘अर्जदार त्याच साझ्यातील’ असे न करता ‘अर्जदार त्याच तालुक्यातील’ कुठल्याही गावचा रहिवासी असावा. अशी सुधारणा अटी व शर्तींमध्ये करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी अकोला यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे कि, इतर संवर्गातील पदे भरताना अर्जदाराचे रहिवासाबाबत कोणतीही अट नाही. परंतु कोतवाल पदाकरिता मात्र ही अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या पदावर अन्याय होत आहे. असे होऊ नये याकरिता ‘त्याच साझ्यातील’ ही अट शिथिल करून ‘त्याच तालुक्यातील’ अशी सुधारणा करावी अशी मागणी भाष्कर साळुंके यांनी केली आहे.