रामटेक – राजू कापसे
ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा गोरगरीबांच्या मुलांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्या शाळा टिकायला हव्यात. मात्र नागपूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये सुमारे ८०९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिवाय ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये ३० शिक्षक निवृत्त होणार आहेत.
यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होईल. परिणामी अनेक पिढ्या बर्बाद होतील. हा सर्व प्रकार पाहता महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिक्षण प्रक्रिया पूर्ववत सुरू राहावी, म्हणून तातडीने शिक्षकांची पद भरती करावी, अशी भूमिका राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटनचे प्रदेशाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी मांडली आहे.
गेल्या २०१३ पासून शिक्षकांची पदे भरण्यात आलेली नाहीत. शिवाय दर महिन्यात २५ ते ३० शिक्षक निवृत्त होतात. ही आकडेवारी पाहता हळूहळू का होईना शाळांमधील शिक्षक संख्या रोडावत आहे. जिल्ह्यात एकूण १५१५ शाळा असून, ७२ हजार विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत.
याकरिता शिक्षकांची ४५०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९०० पदे रिक्त आहेत. ही आकडेवारी मन सुन्न करणारी आहे. यामुळे शिक्षण खात्याने यावर गांभीर्याने विचार करून जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची भरती करणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ७८ शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी असले तरी शिक्षकच नाहीत. मग तेथील मुलांनी शिक्षण कसे घ्यावे, याचेही उत्तर शासनाने द्यायला हवे, असेही चंद्रपाल चौकसे यांनी म्हटले आहे.
काही शाळांमध्ये दुसऱ्या गावातील शिक्षक येऊन शिकवितात. पण असे उधारीवर शिक्षक घेण्याची पद्धत किती दिवस चालेल असा सवाल चंद्रपाल चौकसे यांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत पाहता जिल्हा परिषद शाळांची स्थिती पाहता तातडीने शिक्षक भरतीशिवाय दुसरा पर्याय नाही.
तेव्हा महाराष्ट्र शासनाने विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेत यावर रामबाण तोडगा काढावा. अन्यथा याविरोधात आम्ही आंदोलन करू असाही इशारा सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी दिला आहे.
“काहीही करा पण शिक्षक आणा”
शिक्षकांची पदे रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. तो परिणाम टाळावा याकरिता शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
याकरिता निधीची गरज आहे. तो निधी तरी शासनाने तातडीने जिल्हा परिषदेला सुपूर्द करावा. जेणेकरून मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा थांबेल असेही राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी म्हटले आहे.