न्यूज डेस्क – देशातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताचे Update सकाळ पासून सुरूच असून आता अपघातापूर्वीचा रेल्वे वाहतुकीचा चार्ट समोर आला आहे. ओडिशाच्या बालासोर येथे काल शुक्रवारी झालेल्या कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन दुर्घटनेतील मृतांची संख्या 261 वर पोहोचली आहे. या अपघातात आतापर्यंत 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 650 लोक रुग्णालयात दाखल आहेत. रिपोर्टनुसार, तीन गाड्यांची टक्कर झाली. या सगळ्यामध्ये अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी तिन्ही गाड्यांची स्थिती काय होती आणि त्यांच्यात कशी आणि का टक्कर झाली, हे रेल्वे वाहतूक अधिकाऱ्यांनी यार्ड लेआउट किंवा आराखड्यावरून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
NDTV ला रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहंगा बाजार स्टेशनच्या बाहेरील मार्गावर एक मालगाडी उभी होती. हावडाहून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. कोरोमंडल एक्सप्रेसचे इंजिन मालगाडीवर चढले. एकूण 15 बोगी रुळावरून घसरल्या आणि काही बोगी तिसऱ्या ट्रॅकवर पडल्या. काही वेळाने तिसर्या ट्रॅकवर येणारी हावडा-बेंगळुरू दुरांतो कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकली.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या आराखड्यातील मधली लाईन “UP लाईन” आहे, जिथे शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस येत होती. सरकारी सूत्रांनी सांगितले की, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस “DN मेन” म्हणून चिन्हांकित दुसऱ्या मार्गावरून जात होती. सूत्रांनी सांगितले की, कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले, त्यानंतर ते लगतच्या मार्गावरील मालगाडीला धडकले. ट्रेनचे डबे विखुरले आणि ‘डीएन मेन’ मार्गावरही पडले. बेंगळुरू-हावडा ट्रेन कोरोमंडल एक्सप्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांना धडकली. अशा स्थितीत सिग्नलमधील चुकीमुळे हा अपघात झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र, कोरोमंडल एक्स्प्रेसने ‘लूप लाइन’च्या आत थेट मालगाडीला धडक दिली असावी का, असा प्रश्न काही रेल्वे तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. व्हिज्युअल्समध्ये, कोरोमंडल एक्स्प्रेसचे इंजिन मालगाडीच्या वर चढलेले पाहिले जाऊ शकते, जे समोरासमोर टक्कर झाल्याचे सूचित करते.
मुख्य रेल्वे ट्रॅकपासून एक “लूप लाइन” फुटते. काही अंतर गेल्यावर ती पुन्हा मुख्य मार्गावर येते. ते व्यस्त रेल्वे ट्रॅकचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात. बालासोरच्या बहंगा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी ७.२० वाजता हा अपघात झाला. या अपघाताची यांत्रिक, मानवी आणि इतर सर्व बाजूंनी चौकशी केली जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.