कोकण – किरण बाथम
खालापूर तालुक्याची भौगोलिक संरचना जैव वैविध्यतला पूरक असल्याने या परिसरात वेळोवेळी वेगवेगळ्या प्रजाती प्राणी मित्रांना आढळून येत असतात. खोपोली शहरातील महिंद्रा सॅनियो कंपनीच्या आवारात खवले मांजर दिसून आल्याची माहिती खोपोलीतील प्राणी मित्रांना मिळाली.
त्या बाबीचे गांभीर्य जाणून घेत खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार आणि खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांना त्या बाबतची माहिती देऊन प्राणी मित्रांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन खात्याचे कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, प्राणी मित्र आणि कंपनीचे सुरक्षा कर्मचारी यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने चुकीची हाताळणी झाल्यास त्याला त्रास होऊन ते प्राण त्यागते याची खबरदारी घेत त्याला सुरक्षितपणे पकडले. आढळून आलेले खवले मांजर हे संपूर्ण वाढ झालेले साधारणतः 15 किलो वजनाचे होते.
खवले मांजर हे अत्यंत दुर्मिळ असून पर्यावरणाच्या अन्न साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. वन्यजीव कायदा १९७२ मधील शेड्युल १ मध्ये मोडणारे असते. त्या कंपनीच्या शेजारी डोंगर आणि झाडी असल्याने भक्ष शोधण्याच्या नादात ते त्या ठिकाणी आले असल्याची माहिती तालुका वनअधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली.