आकोट- संजय आठवले
आकोट अकोला मार्गावरील गांधीग्राम नजीकचा पूल नादुरुस्त झाल्याने या मार्गावरील बंद करण्यात आलेल्या वाहतुकीचा मार्ग आता पूर्णपणे खुला झाला असून आज दिनांक पाच एप्रिल पासून या मार्गाने बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या संदर्भात कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोला यांनी गांधीग्राम जवळील नवीन बांधलेला रपटा हा बस वाहतुकीकरिता सक्षम असल्याचा अभिप्राय दिला आहे. परंतु हा रपटा पार करताना बसची वेग मर्यादा ताशी २० किलोमीटर ठेवण्याची खबरदारी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
या अभिप्रायानंतर वाहतूक नियंत्रक (प्रशिक्षण) यांनी सदर रपट्याची चाचणी करून आपला अभिप्राय दिला कि, अकोला आकोट जाताना चढाई असल्याने बसला स्पेशल गिअर टाकून पुढे जाऊ द्यावे. तसेच अकोला ते आकोट येताना बस पुलावर थांबवून स्पेशल गिअर टाकावा. जेणेकरून गाडी थांबणार नाही. या अभिप्रायानंतर विभाग नियंत्रण राज्य परिवहन अकोला यांनी आगार व्यवस्थापक अकोला, आकोट, कारंजा, मंगरूळपीर, वाशिम, रिसोड, तेल्हारा, मुर्तीजापुर यांना पत्र पाठवून आपल्या आगारातील आंतरराज्य, मध्यम पल्ला, विनावाहक, शटल व जलद वाहने गांधीग्राम मार्गे सुरु करण्याची सूचना दिली आहे. सदर अंमलबजावणी पाच एप्रिल पासून करण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे.